महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । पावसाळी अधिवेशनाच्या ७ व्या दिवशी विरोधकांनी महागाई आणि खाद्यपदार्थांवरील जीएसटीच्या मुद्द्यावर संसदेत सरकारला धारेवर धरले. या गदारोळामुळे राज्यसभेचे उपसभापती हरिवंश सिंह यांनी तृणमूल काँग्रेसचे ७, द्रमुकच्या ६ खासदारांसह एकूण १९ सदस्यांना शुक्रवारपर्यंत निलंबित केले. यामध्ये टीआरएसचे ३, माकप २आणि भाकपच्या एका खासदाराचा समावेश आहे.सोमवारी लोकसभेत ४ काँग्रेस सदस्यांना अधिवेशनकाळापर्यंत निलंबित करण्यात आले होते.
या कारवाईनंतर विरोधकांनी जोरदार टीका केली. सामान्य माणसाच्या जिव्हाळ्याच्या विषयांवर सरकारला चर्चा नकोय. हा लोकशाहीवर हल्ला आहे असा आरोप विरोधकांनी केला. तृणमूल काँग्रेसचे डेरेक ओब्रायन म्हणाले, भारतात लोकशाहीच निलंबित झाली आहे. ससंदेचे रूपांतर एका अंधाऱ्या चेंबरसारखे करून ठेवले आहे.
विरोधी खासदारांच्या निलंबनानंतर केंद्र सरकारने महागाईच्या मुद्द्यावर चर्चेस तयार असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल म्हणाले की, अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांची प्रकृती सुधारली व त्या संसदीय कामकाजात सहभागी झाल्यावर सरकार महागाईवर चर्चा करण्यास तयार आहे.