महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ जुलै । नॅशनल हेराल्ड प्रकरणी बुधवारी तिसऱ्या दिवशी ईडी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांची चौकशी करणार आहे. सोनियांची 21 जुलैला 3 तास आणि 26 जुलैला 6 तास चौकशी करण्यात आली. सोनियांच्या चौकशीवरून काँग्रेस आज पुन्हा देशभर सत्याग्रह करणार आहे.
मंगळवारी राहुल गांधींसह काँग्रेसच्या 50 खासदारांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले. सोनियांची चौकशी संपल्यानंतर या खासदारांना सोडून देण्यात आले. संसदेजवळील विजय चौकात आंदोलनादरम्यान सर्व खासदारांना ताब्यात घेण्यात आले. ताब्यात घेतल्यानंतर राहुल यांनी टीका करत देशाला पोलिस राज्य बनवले असल्याचा आरोप केला होता.
ईडीने सोनिया गांधी यांच्याकडे केलेल्या चौकशीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसने त्यांच्या मुख्यालयात सर्व बड्या नेत्यांची बैठक बोलावली आहे. त्याचवेळी मल्लिकार्जुन खरगे यांच्या अध्यक्षतेखाली संसद भवनात खासदारांची बैठकही होणार आहे.
तब्बल एक वर्षांनंतर गुलाम नबी आझाद 24 अकबर रोड येथे पत्रकार परिषद घेणार आहेत. आझाद हे काँग्रेसच्या G-23 गटाचे नेते मानले जातात आणि 2019 च्या निवडणुकीपासून ते नाराज आहेत.
काँग्रेस खासदार शक्ती सिंह गोहिल यांनी राज्यसभेतील कामकाज स्थगित करण्याची नोटीस दिली आहे. गोहिल यांनी नोटीसमध्ये म्हटले आहे की, तपास यंत्रणा विरोधी पक्षांवर सूडाच्या भावनेने कारवाई करत आहे.
मंगळवारी झालेल्या आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष बीव्ही श्रीनिवास यांना दिल्ली पोलिसांच्या काही कर्मचाऱ्यांनी केस ओढत मारहाण केली. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दोषींवर कारवाई करण्यात येईल, असे निवेदन जारी केले.