महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : कोरोना व्हायरसमुळे देशभरात लॉकडाउन करण्यात आलं आहे. राज्यातली संचारबंदी लागू करण्यात आली असताना वाधवान कुटुंबीयांनी महाबळेश्वर गाठले होते. या प्रकरणी राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी हे प्रकरण आता ईडी आणि सीबीआयकडे सोपवणार असल्याची माहिती दिली आहे. अनिल देशमुख यांनी फेसबुकवर लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी राज्यातील वाधवान प्रकरणावर भाष्य केलं.
वाधवान कुटुंबीयांना होम क्वारंटाइन करण्यात आले होते. त्यांचा आज क्वारंटाइनचा कार्यकाळ संपत आहे. त्यामुळे या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी ईडी आणि सीबीआयला त ताब्यात घेण्याची सूचना केली आहे. सीबीआयने वाधवान कुटुंबांची संपूर्ण चौकशी करुन सत्य परिस्थितीत समोर आणावी, असं देशमुख यांनी स्पष्ट केलं आहे.
सीबीआय वाधवान कुटुंबीयांना घेऊन जात नाही तोपर्यत वाधवान कुटुंब आमच्या ताब्यात राहणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. सीबीआयने आमच्याकडे संपर्क केल्यानंतर त्यांच्याकडे वाधवान कुटुंबियांना सोपवण्यात येईल, अशी माहितीही अनिल देशमुख यांनी यावेळी दिली.