महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । ऑस्ट्रेलियामध्ये या वर्षी 16 ऑक्टोबर- 13 नोव्हेंबर या कालावधीत टी-20 विश्वकरंडकाचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रतिष्ठेच्या स्पर्धेला काही दिवस बाकी असतानाच भारतीय संघ उद्यापासून वेस्ट इंडीजविरुद्ध पाच टी-20 सामन्यांची मालिका खेळणार आहे. दोन देशांमधील ही मालिका टी-20 विश्वकरंडकाची रंगीत तालीम ठरणार आहे.
वेस्ट इंडीजने भारताविरुद्ध 2017 मध्ये टी-20 मालिका जिंकली होती. ही मालिका एका सामन्याची होती. त्यानंतर मात्र भारताने वेस्ट इंडीजविरुद्ध चार टी-20 मालिका जिंकल्या आहेत. दोन देशांमध्ये अखेरची टी-20 मालिका 2021-22 मध्ये भारतात झाली. या मालिकेत यजमान संघाने 3-0 अशा फरकाने घवघवीत यश संपादन केले. आता सलग दुसऱ्या मालिकेत वेस्ट इंडीजवर निर्भेळ यश संपादन करण्यासाठी टीम इंडियाचा संघ प्रयत्नशील असेल.
हुड्डा देणार विराटला आव्हान?
वेस्ट इंडीजविरुद्धच्या मालिकेत भारतीय संघातील बहुतांशी प्रमुख खेळाडू क्रिकेटच्या मैदानात उतरणार आहेत. अपवाद विराट कोहलीचा. त्याने या मालिकेमधून माघार घेतली आहे. आगामी पाच सामन्यांमध्ये दीपक हुड्डाला त्याची जागा घेण्याची संधी असणार आहे. दीपक हुड्डाने या मालिकेत ठसा उमटवल्यास टी-20 विश्वकरंडकासाठी भारतीय संघाच्या यादीत त्याच्या नावाचा विचार होऊ शकतो. विराट कोहली हा आमच्या संघाचा एक महत्त्वाचा घटक आहे, असे भारतीय संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत असले, तरी ऐनवेळी फलंदाजीचा फॉर्म हा अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो.
अश्विनकडे संधी
रवींद्र जडेजा अद्यापही पूर्णपणे फिट झालेला नाही. युजवेंद्र चहलला विश्रांती देण्यात आली आहे. वॉशिंग्टन सुंदर दुखापतीमुळे पुनरागमन करू शकलेला नाही. अशा परिस्थितीत रवीचंद्रन अश्विन या अनुभवी ऑफस्पीरनकडे टी-20 क्रिकेट प्रकारातील भारतीय संघातील स्थान पक्के करण्याची संधी असणार आहे. त्याच्यासमोर अक्षर पटेल, कुलदीप यादव व रवी बिश्नोईचे आव्हान असेल.
रोहितसोबत सलामीला कोण?
कर्णधार रोहित शर्माबरोबर पहिल्या लढतीत सलामीला कोणता फलंदाज येणार, हा प्रश्न या वेळी उभा ठाकला आहे. के. एल. राहुल दुखापतीमुळे या मालिकेत खेळण्याची शक्यता कमीच आहे. त्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत इशान किशन व रिषभ पंत या डावखुऱ्यांमध्ये सलामीच्या जागेसाठी रस्सीखेच लागली आहे. अर्थात, सध्याचा फॉर्म बघता रिषभ पंतलाच सलामीला खेळण्याची संधी दिली जाण्याची शक्यता आहे.