महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २९ जुलै । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) गटाकडून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना धक्क्यांवर धक्के दिल्या जात आहेत. अकोल्यात शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे. अकोल्याचे माजी विधान परिषद आमदार गोपीकिशन बाजोरिया (Gopikishan Bajoria) आणि त्यांचे सुपुत्र विद्यमान विधान परिषद आमदार विप्लव बाजोरिया (Viplav Bajoria) यांच्यासह शिवसेनेचे अनेक पदाधिकारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी झाले आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून बाजोरिया शिंदे गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. मात्र आज बाजोरियांनी शिंदे गटात अधिकृत प्रवेश घेतला. शिंदे यांच्या उपस्थितीत मुंबईच्या सह्याद्री अतिथीगृहात हा प्रवेश झाला. दरम्यान, त्यांच्या प्रवेशानंतर जिल्ह्यातील शिवसेनेच्या नेत्यांकडून आक्रमक प्रतिक्रिया समोर येत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर शिवसेनेसमोर अनेक आव्हाने समोर येत आहे, दररोज शिवसेनेचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक, जिल्ह्याचे प्रमुख नेते शिंदे गटात सहभागी होतं आहे. आता अकोल्यातून शिवसेनासह युवा सेनेला धक्का बसला आहे. मुंबई येथे अकोल्यातील माजी आमदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश घेतला आहे.