महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ३१ जुलै । एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेनेची बाजू एकहाती लावून धरणारे खासदार संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकली आहे. गेल्या चार तासांपासून संजय राऊत (Sanjay Raut) यांची ईडीच्या अधिकाऱ्यांकडून कसून चौकशी सुरु आहे. सध्याच्या एकूण घडामोडी पाहता संजय राऊत यांना ईडीकडून (ED) अटकही केली जाऊ शकते. या पार्श्वभूमीवर संजय राऊत यांच्या टीकेमुळे दुखावले गेलेले भाजप आणि शिंदे गटाचे नेते आता त्यांच्यावर तुटून पडले आहेत. आज सकाळपासून किरीट सोमय्या यांच्या साथीने शिंदे गटाचे आमदारही संजय राऊत यांचे वाभाडे काढताना दिसत आहेत. (ED raids at Shivsena leader Sanjay Raut residence in Mumbai)
मात्र, या सगळ्यात शिंदे गटातील नेते रामदास कदम यांची प्रतिक्रिया लक्ष वेधून घेणारी होती. संजय राऊत हे ईडीला कधीची घाबरणार नाहीत, ते ईडीच्या चौकशीला निर्भयपणे सामोरे जातील, असे रामदास कदम यांनी म्हटले. आता त्यांच्या या वक्तव्यामागे कौतुक होते की खोचकपणा होता, हा प्रश्नच आहे. संजय राऊत यांच्या घरावर ईडीने धाड टाकल्यानंतर रामदास कदम यांनी पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांनी म्हटले की, संजय राऊत आणि माझ्यात अजूनही डायलॉग सुरुच आहे. मी त्यांना म्हटलं होतं की आतातरी तुम्ही थांबाल का? बघा थांबता आलं तर, असे मी संजय राऊत यांना म्हटल्याचे रामदास कदम यांनी सांगितले.
संजय राऊत हे कोणालाच भीत नाहीत. भीती त्यांच्या मनाला कधीच स्पर्श करत नाही. ईडी, सीडी किंवा पीडी असू दे संजय राऊत हे कोणालाही घाबरणारे नाहीत. ते सगळ्यांना सामोरे जातील. संजय राऊत यांनी भ्रष्टाचार केला नसेल, ते चोख असतील तर त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. ते या सगळ्यातून सहीसलामत सुटून बाहेर येतील. संजय राऊत तेवढे सक्षम आहेत, असेही रामदास कमद यांनी म्हटले.