महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ ऑगस्ट । मागील आठवड्यात औरंगाबाद जिल्हा दौऱ्यावर आलेल्या आदित्य ठाकरे यांनी ‘शिवसेनेची साथ सोडलेल्या जिल्ह्यातील पाचही आमदारांनी राजीनामा देऊन निवडून येऊन दाखवावे,’ असे आव्हान दिले होते. ते स्वीकारत ‘मुख्यमंत्री म्हणाले तर राजीनामा देतो आणि पुन्हा निवडून येऊन दाखवतो,’ अशी स्टंटबाजी आमदार अब्दुल सत्तार यांनी शुक्रवारी केली. पण रविवारी (३१ जुलै) सिल्लोड येथील शक्तिप्रदर्शनात त्यांनी ‘आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला तरच मी सोमवारी राजीनामा देतो,’ असे घूमजाव केले.
मंत्रिपदाच्या स्पर्धेत असलेल्या सत्तार यांनी रविवारी सिल्लोड येथे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनेक कामांचे उद्घाटन, भूमिपूजन करून घेतले. ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिल्याबद्दल शिंदे यांचा सत्कार केला. सत्तार म्हणाले की, आदित्य ठाकरेंनी राजीनामा दिला तर मीही देतो. मुख्यमंत्र्यांचे आदेश असतील तर सोमवारी सकाळीच फॅक्सने राजीनामा पाठवतो व पुन्हा निवडणूक लढवून विजयी होऊन दाखवतो. उद्धव ठाकरेंनी हिंदुत्वाचा मुद्दा सोडल्याने मी शिंदे गटात गेलो. शिंदे हेच आमचे रिमोट कंट्रोल आहेत. मुख्यमंत्री म्हणाले की, मराठवाड्यातील शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी आमचे सरकार काम करेल. १५ ऑगस्ट रोजी समृद्धी महामार्गाच्या पूर्ण झालेल्या कामाचे उद्घाटन करण्याचे नियोजन आहे.