महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.१ ऑगस्ट । महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी होणारी सुनावणी बुधवारपर्यंत लांबणीवर पडली आहे. ठाकरे आणि शिंदे गटाने एकमेकांविरोधात दाखल केलेल्या याचिकांवर सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठासमोर सुनावणी होईल.
राज्यातील सत्तासंघर्षावर सर्वोच्च न्यायालयात गेल्या 20 जुलै रोजी सुनावणी झाली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाने खटले निकाली काढण्यासाठी मोठे खंडपीठ अथवा घटनापीठ स्थापन करण्याचे संकेत दिले होते. शिंदे गटाची बाजू मांडताना ज्येष्ठ वकील हरिश साळवे यांनी कागदपत्रे दाखल करण्याचे कारण देत वेळ वाढवून मागितला होता. दुसरीकडे ठाकरे गटाकडून लवकर सुनावणी घेण्याची विनंती अॅड. कपिल सिब्बल आणि अॅड. अभिषेक मनू सिंघवी यांनी केली होती. सिब्बल यांनी या प्रकरणाशी संबंधित विधिमंडळाचे रेकॉर्ड तपासण्यासाठी विधान भवनातील सर्व कागदपत्रे सर्वोच्च न्यायालयाने मागवावीत, अशी विनंती केली होती. राज्यात शिंदे सरकारची स्थापना अवैधपणे झाली असल्याचा ठाकरे गटाचा आक्षेप आहे. कायद्यातील दहाव्या अधिसूचीचे उल्लंघन झाल्याचे या गटाकडून सांगण्यात आले आहे.
शिंदे गटाकडून पक्षांतरबंदी कायद्याचे उल्लंघन झाले असून फुटीर गटाचे इतर पक्षात विलीनीकरण हाच पर्याय असल्याचे ठाकरे गटाचे म्हणणे आहे; तर आम्ही फुटलो नसून शिवसेनेतच आहोत, असे सांगत शिंदे गटाने शिवसेनेवर दावा ठोकलेला आहे. शिंदे गटाने निवडणूक आयोगाकडे धाव घेत पक्षावर तसेच ‘धनुष्यबाण‘ या निवडणूक चिन्हावर दावा केलेला आहे. त्याला आक्षेप घेत ठाकरे गटाने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवरही बुधवारी सुनावणी होत आहे.