माझ्या बोलण्याचा विपर्यास केला ; राज्यपालांचे नाव न घेता केलेल्या टोलेबाजीवर सुबोध भावेंनी मागितली माफी

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ ऑगस्ट । चित्रपट अभिनेता सुबोध भावे यांनी अखेर मंगळवारी सपशेल माफी मागितली आहे. माझ्या बोलण्याचा विपर्यास केला. माझे संपूर्ण भाषण तुम्ही ऐका. मात्र, त्यानंतरही तुम्हाला काही वाटत असेल, तर मी क्षमा मागतो, अशा शब्दांत त्यांनी आपल्या भावना प्रकट केल्या.

आपण सर्व चांगले शिक्षण घेऊन सतत करिअरच्या मागे धावत आहोत. मला चांगली नोकरी कशी मिळेल, परदेशी जाऊन स्थायिक कसे होता येईल, याचाच विचार आपण करत आहोत. ज्या राजकारण्यांची लायकी नाही, अशांच्या हातात आपण देश उभारणीचे काम दिले आहे. अशी टीका सुबोध भावे यांनी केली होती. मात्र, यावरून त्यांच्यावर जोरदार टीका झाल्यानंतर त्यांनी यावर स्पष्टीकरण दिले आहे. माझे म्हणणे चुकीच्या पद्धतीने मांडण्यात आले. माझ्या बोलण्याचा जो अर्थच नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील, तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची आहे, असे मत सुबोध भावेंनी व्यक्त केले आहे.

काय म्हणाले होते भावे?

राजकारण्यांच्या हातात देश देऊन काही होणार नाही, ते काय करतात हे आपल्यसमोर आहेच. म्हणूनच पुढच्या पिढीमध्ये राष्ट्रीय शिक्षणाची बीजे रोवून त्यांना देशासाठी उभे करणे गरजेचे आहे. इंग्रजांनी नोकरदार तयार व्हावेत, यासाठी आपल्या देशात शिक्षण व्यवस्था आणली. आजही आपण तीच व्यवस्था पाळत आहोत. म्हणूनच मुंबई, महाराष्ट्रातून काही लोक निघून गेले, तर पैसेच राहणार नाहीत, अशी वक्तव्ये करण्यास काही राजकारणी धजावतात, असे सांगत भावे यांनी राज्यपालांच्या वक्तव्याचाही समाचार घेतला होता.

स्पष्टीकरणात म्हणाले की…

माझ्या एका भाषणाच्या चुकीच्या बातमीने गोंधळ घातला आहे. त्याचा हा संपूर्ण व्हिडीओ. (कुठेही कट न करता जसाच्या तसा) आपण जे काही आणि ज्या अर्थाने बोललो त्याची जबाबदारी आपण घ्यावी, या मताचा मी आहे, पण जो अर्थच माझ्या बोलण्याचा नव्हता आणि तो जर चुकीच्या पद्धतीने बातमीदार पोचवत असतील, तर त्याची संपूर्ण जबाबदारी त्यांची आहे, असे म्हणताना माझे संपूर्ण भाषण पाहिल्यावर जर तुम्हाला वाटले की माझे चुकले तर मी मनापासून क्षमा मागतो. असे म्हणत सुबोध भावेंनी त्यांच्या वक्तव्यावर स्पष्टीकरण दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *