Vegetable Price Hike : ऐन श्रावणात फळं-भाज्यांचे दर कडाडले ; रानभाज्याचे भावसुद्धा गगनाला

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.३ ऑगस्ट । श्रावण महिन्यात फळ आणि भाजाच्या वाढलेल्या मागणीमुळे गेल्या काही दिवसांपासून दरात मोठी वाढ झाली असून किरकोळ बाजारात महागाईने नवा उच्चांक गाठला आहे. किरकोळ बाजारात भाज्यांची ४० टक्क्यांनी दरवाढ झाली आहे तर फळांचे दरही २० टक्क्यांनी वाढले आहेत. दुसरीकडे पावसाळ्यात येणाऱ्या रानभाज्याचे भावसुद्धा गगनाला भिडले आहेत.

राज्याच्या वेगवेगळ्या भागांमध्ये गेल्या पंधरवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे भाज्यांचे मोठे नुकसान झाले. तसेच काही किरकोळ व्यापाऱ्यांनी साठवणूक केलेल्या भाज्याही खराब झाल्या आहेत. त्यामुळे मागणी वाढली असताना बाजारात भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर घटली आहे. इंधन दरवाढीमुळे वाहतूक खर्चात यापूर्वीच वाढ झाली आहे.

राज्यातील जवळपास सर्वच प्रमुख महामार्गांना तसेच अंतर्गत मार्गांना खड्ड्यांचा विळखा पडला आहे. यामुळे वाहतूक कोंडीचे प्रमाणही वाढले आहे. त्यामुळेही वाहतूक खर्च सतत वाढत असल्याचे वाहतूकदारांचे म्हणणे आहे. या सर्वाचा एकत्रित परिणाम भाज्यांच्या दरावर झालेला पहायला मिळत आहे. तर दुसरीकडे श्रावण महिना सुरू झाल्याने खवय्ये गावरान आणि रान भाज्यांना सर्वाधिक पसंती देत आहेत. वाढत्या मानवी जंगलावरील अतिक्रमणांनी रानभाज्यांची आवक कमी झाल्याने भाज्यांचे दर वधारले आहेत, असे आदिवासी विक्रेत्याचे मत आहे.

घाऊक बाजारात भाज्यांचे दर १० ते २० टक्क्यांनी तर किरकोळ बाजारात ४० टक्क्यांनी वाढले आहेत. किरकोळ बाजारात भेंडी, गवार, शिमला मिरची आणि घेवडा या भाज्यांचे दर थेट शंभरी पार पोहोचले आहेत. तर जंगलात मिळणाऱ्या करटोल्याच्या भाजीला सध्या बाजारात प्रति किलोला ४०० रुपयांचे दर मिळत आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *