टोलमाफीसंबंधी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरींची राज्यसभेत मोठी घोषणा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । शहरातील टोल माफ केला जाणार असल्याची मोठी घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी केली आहे. राज्यसभेत बोलताना नितीन गडकरी यांनी ही माहिती दिली असून यामुळे शहरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी लोकांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो असं नितीन गडकरींनी निदर्शनास आणून दिलं. हा मागील सरकारचा दोष आहे हे सांगण्यासही ते विसरले नाहीत.

नितीन गडकरी राज्यसभेत प्रश्नोत्तराच्या तासात पुरवणी प्रश्नांना उत्तर देण्यासाठी उभे राहिले होते. राज्यसभेतील सदस्यांनी एक्स्प्रेस-वेवर शहरांच्या हद्दीत टोल प्लाझा उभारण्याचा मुद्दा उपस्थित करत चिंता व्यक्त केली होती. स्थानिक नागरिकांनाही प्रवास करताना टोल भरावा लागत असल्याचा मुद्दा सदस्यांकडून मांडण्यात आला. यावेळी गडकरींनी शहरातील टोल माफ केला जाईल असं स्पष्ट केलं.

गडकरी नेमकं काय म्हणाले –
“सुदैवाने म्हणा किंवा दुर्दैवाने, पण एक्स्प्रेस-वेवरील टोलचा ‘फादर ऑफ टोल टॅक्स” मीच आहे. मीच या देशात बीओटीचा सर्वात पहिला प्रकल्प आणला. महाराष्ट्रातील ठाणे भिवंडी बायपास हा पहिला प्रकल्प होता. आता आम्ही एक नवीन पद्धत सुरू करत आहोत, ज्यामध्ये टोलमधून शहरी भाग वगळला जाईल, त्यांच्याकडून टोल घेतला जाणार नाही,” असं नितीन गडकरी यांनी सांगितलं आहे.

पुढे ते म्हणाले “शहरातील लोकांकडून कोणताही अधिभार घेतला जाणार नाही. कारण १० किलोमीटर रस्त्याच्या वापरासाठी त्यांना ७५ किलोमीटरचा टोल भरावा लागतो”. यावर एका खासदाराने हे फार चुकीचं आहे म्हटलं असता नितीन गडकरी यांनी, हा माझा दोष नाही असं सांगितलं.

“हा माझा नव्हे, तर मागील सरकारचा दोष आहे. पण आम्ही यामध्ये दुरुस्ती करु. जे तुम्हाला वाटत आहे, त्याच माझ्याही भावना आहेत. आम्ही लवकरच सर्व गोष्टी दुरुस्त करु,” .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *