महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ४ ऑगस्ट । शिवसेनेमध्ये बंडखोरी करून एकनाथ शिंदे यांनी वेगळा गट स्थापन केला आणि आम्हीच शिवसेना असल्याचा दावा केला. त्यामुळे शिवसेना कुणाची? असा प्रश्न उपस्थितीत केला गेला आहे. आज सर्वोच्च न्यायालयामध्ये पुन्हा एकदा सुनावणी पार पडली. यावेळी निवडून आल्यानंतर तुम्ही राजकीय पक्षाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असाल तर ते लोकशाहीला धोका आहे का? असा सवाल कोर्टाने शिंदे गटाला विचारला आहे.
शिंदे गटाने शिवसेनेत बंडखोरी केल्यामुळे वाद सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचला. एकूण 5 याचिका दाखल करण्यात आल्या आहेत. आज सुप्रीम कोर्टात सरन्यायाधीश एन.व्ही. रमन्ना यांच्या अध्यक्षतेखालील तीन सदस्यीय खंडपीठापुढे ही सुनावणी सुरू आहे. शिंदे गटाच्या वतीने वकिल हरिश साळवे, नीरज कौल यांनी युक्तिवाद केला. तर शिवसेनेच्या वतीने वकील कपिल सिब्बल, मनु सिंघवी यांनी बाजू मांडली. तर राज्यपालांच्या वतीने वकील तुषार मेहता यांनी बाजू मांडली. यावेळी हरीश साळवे यांना लेखी युक्तिवाद सादर करण्यास सांगितले होते.