महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) सध्या ईडीच्या (ED) कोठडीत आहेत. संजय राऊत यांच्यावर पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी ईडीनं कारवाई केली आहे. संजय राऊत यांनी ईडीच्या कोठडीतून त्यांना पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांना पत्र लिहून संकट काळात पाठिशी राहणाऱ्या विरोधी पक्षांच्या नेत्यांचे आभार मानले आहेत. संजय राऊत यांनी काँग्रेस (Congress) नेते मल्लिकार्जून खर्गे ( Mallikarjun Kharge) यांना लिहिलेलं पत्र माध्यमांसमोर आलं आहे. संजय राऊत यांनी पत्रात मल्लिकार्जून खर्गे यांना लिहिलेल्या पत्रात बाळासाहेब ठाकरेंनी दिलेल्या मंत्राची आठवण करुन दिली आहे.
विरोधी पक्ष आणि त्यांच्या मित्रपक्षांसाठी सध्या कठिण दिवस आहेत. केंद्र सरकारकडून आणि केंद्रीय यंत्रणांकडून माझ्यावर राजकीय हेतून आणि सूडभावनेतून करण्यात आलेल्या कारवाईवेळ तुम्ही मला पाठिंबा दिलात त्याबद्दल आपला आभारी आहे, असं संजय राऊत म्हणाले. मी सुरु केलेला सत्यासाठीचा लढा कितीही दबाव टाकला तरी थांबवणार नाही. मी माघार घेणार नाही लढत राहणार आहे. वंदनीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी रडायचं नाही लढायचं हा मंत्र दिलेला आहे त्याप्रमाणं संघर्ष करत राहणार आहे, असंही राऊत यांनी म्हटलं.