महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । 2024 संपण्याआधी देशात 26 ग्रीन एक्स्प्रेस हायवे बांधले जातील. त्यावर 125-130 किमी प्रतितास या वेगाने प्रवास पूर्ण होऊ शकेल. रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संसदेत ही माहिती दिली. त्यांनी दावा केला की, 2024च्या समाप्तीपूर्वी देशातील रस्ते पायाभूत सुविधा अमेरिकेशी स्पर्धा करेल.
नितीन गडकरी म्हणाले, “सध्या भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) ची आर्थिक स्थिती अतिशय मजबूत आहे. मी सभागृहात हे ऑन रेकॉर्ड सांगत आहे की, मी दरवर्षी 5 लाख कोटी रुपयांचे रस्ते बांधू शकतो. आमच्याकडे पैशांची कमतरता नाही. संसदेतील कोणत्याही पक्षाच्या खासदाराला विचारा, ज्याने माझ्याकडे रस्ता बांधण्यासाठी पैसे मागितले, त्याला मी पैसे दिले आहेत. मी कोणत्याही पक्षाच्या खासदाराला नकार दिला नाही.
ते म्हणाले, ‘NHAIला AAA रेटिंग मिळाले आहे. अलीकडेच दोन बँकांचे अध्यक्ष माझ्याकडे आले आणि दोघांनी मला 25-25 हजार कोटी रुपयांचे कर्ज देण्याचा प्रस्ताव ठेवला. मला हे पैसे नुकतेच 6.45% व्याजदराने मिळाले आहेत. त्यामुळे रस्ते बांधण्यासाठी NHAIकडे पुरेसा पैसा आहे.
गडकरी म्हणाले की, सध्या आमच्याकडे टोल वसूल करण्याची यंत्रणा आहे, मात्र आम्ही दोन पर्यायांवर काम करत आहोत. पहिली उपग्रह-आधारित टोल-प्रणाली आहे, ज्यामध्ये कारमध्ये GPS स्थापित असेल आणि त्यातून टोल आपोआप कापला जाईल.
दुसरी यंत्रणा म्हणजे नंबर प्लेट बदलणे. 2019 पासूनच आम्ही नवीन प्रकारची नंबर प्लेट बनवण्याच्या तंत्रज्ञानावर काम सुरू केले आहे. आता ही नंबर प्लेट लावणे निर्मात्याला बंधनकारक असणार आहे. जुन्या नंबर प्लेट्स बदलून नवीन नंबर प्लेट लावण्यात येणार आहेत. नवीन नंबर प्लेटला एक सॉफ्टवेअर जोडले जाईल, ज्यातून टोल कापला जाईल.
भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण ही भारत सरकारची स्वायत्त संस्था आहे. त्याची स्थापना 1955 मध्ये झाली. ही देशातील 1,32,499 किमी लांबीच्या राष्ट्रीय महामार्गांपैकी 50,000 किमीच्या नेटवर्कचे व्यवस्थापन पाहते.
NHAI चे काम अंब्रेला हायवे योजना, भारतमाला योजनेसाठी निधी देणे आहे. NH लिंकेज असलेल्या जिल्ह्यांची संख्या 300 वरून 550 पर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. याशिवाय रस्त्याच्या कडेला स्वच्छतागृहे, फूड प्लाझा आणि वैद्यकीय सुविधांची व्यवस्था करणे, वृक्षारोपण करणे हीही या संस्थेची जबाबदारी आहे.