महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ५ ऑगस्ट । राज्यात पावसासाठी पोषक हवामान निर्माण होत असून, मॉन्सूनच्या पावसाची पुन्हा सुरुवात झाली आहे. कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. यामुळे दक्षिण कोकणात जोरदार तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात विजांच्या गडगडाटासह जोरदार ते मुसळधार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. दरम्यान, राज्यात पुन्हा एकदा पुढील पाच दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे.
भारतीय हवामान खात्याने यासंदर्भात ट्वीट करत माहिती दिली आहे. राज्यात 5 दिवस मान्सून सक्रिय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील काही भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टी होण्याचीही शक्यता आहे. येत्या २४ तासांत दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागांत मेघगर्जनेसह मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे.
दरम्यान, राज्यात पुढील चार दिवस कोकण व मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार सरी तसेच किनारपट्टीलगत सोसाट्याचे वारे वाहतील, मराठवाड्यात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. तर विदर्भात येत्या शनिवारपासून पावसाचा जोर वाढू शकतो. सिंधुदुर्ग, रत्नागिरी जिल्ह्यासह कोल्हापूर, साताऱ्याच्या घाटमाथ्यावर जोरदार पावसाची शक्यता असल्याने पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.
‘या’ जिल्ह्यांना असेल पावसाचा येलो अलर्ट
रायगड, नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, नगर, पुणे, औरंगाबाद, जालना, बीड, परभणी, नांदेड, हिंगोली, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, बुलडाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर.