चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झालाय; बंडखोर आमदार शिरसाटांची टीका

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ६ ऑगस्ट । राज्यात शुक्रवारी २७१ ग्रामपंचायतींचा निकाल जाहीर झाला. त्यामध्ये भाजप व शिंदे गटाने १२० हून अधिक ग्रामपंचायतींमध्ये विजय मिळवीत बाजी मारली आहे. तर औरंगाबाद जिल्ह्यातील वडगाव कोल्हाटी ग्रामपंचातीच्या निवडणुकीत शिंदे गटाला बहुमत मिळालं आहे. या निवडणुकीवरून आता शिंदे गट आणि ठाकरे गटात नव्या वादाला सुरुवात झाली आहे. वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट (Sanjay Shirsat) यांनी उमेदवार पळवले. या निवडणुकीसाठी त्यांना मोठी रसद मिळाली होती, असा आरोप शिवसेना नेते चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांनी केला आहे. याला आमदार शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

दरम्यान, शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील अनेक ग्रामपंचायतींवर शिंदे गटाने झेंडा फडकावून सेनेला खिंडार पाडले आहे. या निवडणुकीवरून आता शिंदे गट आणि ठाकरे गटात आरोप-प्रत्यारोपाला सुरुवात झाली आहे. वडगाव कोल्हाटी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट यांनी उमेदवार पळवल्याचा आरोप शिवसेना नेते व माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी केला होता. चंद्रकांत खैरे यांच्या आरोपाला शिवसेनेचे बंडखोर आमदार संजय शिरसाट यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे, असं विधान शिरसाट यांनी केलं आहे. ते एका वृत्तवाहिनीशी बोलत होते.

शिरसाट म्हणाले, चंद्रकांत खैरेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. निवडणुकीत ज्यांचा विजय होतो, तो आपण नम्रपणे स्वीकारला पाहिजे. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असता तर शिंदे गटाला हादरा, शिंदे गटाची पराभवाला सुरुवात, असं सगळीकडे म्हटलं गेलं असतं. आता जे उमेदवार निवडून आले आहेत. ते पूर्वीसुद्धा सदस्य होते, त्यांचं नेतृत्व मीच करत होतो. ही जिल्ह्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीमध्ये जवळपास ४० हजार मतदार आहेत. या ४० हजार मतदारांनी आम्हाला बहुमत दिलं आहे, याचा त्यांनी स्वीकार करायला हवा. या निवडणुकीत आमचा पराभव झाला असता तर आम्हीही याचा स्वीकार केला असता.

चंद्रकांत खरैंकडून केलेल्या आरोपांचा नेमका अर्थ काय? असा सवाल विचारला असता, शिरसाट पुढे म्हणाले की, चंद्रकांत खैरे यांना सध्याच्या घडीला ‘मातोश्री’ला खूश करायचं आहे. मीच कसा निष्ठावंत आहे, हे उद्धव ठाकरेंना दाखवून द्यायचं आहे. त्यासाठी केलेला हा केविलवाणा प्रयत्न आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *