महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.७ ऑगस्ट । बंडखोर एकनाथ शिंदे गटाचे प्रवक्ते आणि कोकणातील आमदार दिपक केसरकर यांनी केंद्रीयमंत्री नारायण राणेंचा उल्लेख करत पत्रकार परिषदेतून गौप्यस्फोट केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात झालेल्या बैठकीनंतर उद्धव ठाकरे राजीनामा देणार होते, असे केसरकर यांनी सांगितले. त्यावेळी, आदित्य ठाकरेंचा उल्लेख करत राणे कुटुंबांवर प्रहार केला होता. त्यानंतर, नितेश राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन केसरकरांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे, राणे-केसरकर यांच्यातील वाद टोकाला गेल्याचं पाहायला मिळत आहे.
सुशांत सिंह राजपूत प्रकरणात राणे पिता पुत्रांनी आदित्य ठाकरेंची बदनामी केल्याचा आरोप दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषदेत केला होता. त्यानंतर नितेश राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषद घेत आरोपांना उत्तर दिले. आम्ही हिंदुत्त्वासाठी एकत्र आलो आहोत, हिंदुत्त्वासाठी सगळ्या गोष्टी माफ आहेत, असे आमदार नितेश राणे यांनी म्हटलं होतं. आता, माजी खासदार आणि दुसरे राणेपुत्र निलेश राणे यांनी ट्विटरवरुन दिपक केसरकर यांना टोला लगावला आहे.
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा, १ तारखे पासून आमच्याकडे ड्रायव्हर ची जागा रिकामी आहे.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 7, 2022
दिपक केसरकर म्हणतो मी राणेंबरोबर काम करायला तयार आहे, नोकरी मागायची आहे तर नीट मागा. १ तारखेपासून आमच्याकडे ड्रायव्हरची जागा रिकामी आहे, अशा शब्दात निलेश राणेंनी दिपक केसरकर यांना टोला लगावला आहे.
नितेश राणे काय म्हणाले
महाराष्ट्रामध्ये हिंदुत्ववादी विचाराचे सरकार आहे. हिंदुत्ववाचा विचार आजून प्रखर झाला पाहीजे. यासाठी 166 आमदार एकत्र आले आहेत. हिंदुत्वाचे रक्षण करणे आणि हिंदुत्वाला ताकद देण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहोत. यामुळे आमच्यासाठी हिंदुत्व हा विषय महत्वाचा आहे. हिंदुत्वासाठी सगळ्या गोष्टी माफ आहेत, येवढेच मी सांगतो, असे नितेश राणे म्हणाले.