महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । महाराष्ट्रात होत नसलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावरून (Maharashtra Cabinet Expansion) अजित पवारांनी (Ajit Pawar) सरकारवर टीका केली. मंत्र्यांचे अधिकार सचिवांना द्यायचे असतील तर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनीही घरी बसावं. मंत्रिमंडळ विस्तार झाला आणि इच्छुक आमदारांना संधी मिळाली नाही, तर ते फुटून बाहेर पडतील, अशी भीती वाटत असल्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार होत नाही का? असा सवालही अजित पवारांनी विचारला. अजित पवारांच्या या टीकेला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी उत्तर दिलं आहे.
‘अजित पवारांना आता हे बोलावं लागेल, कारण ते आता विरोधी पक्षनेते आहेत. त्यांच्या काळात 30-32 दिवस 5 मंत्री होते, हे त्यांना आता विसरायला लागेल,’ असं प्रत्युत्तर फडणवीस यांनी दिलं. तसंच मंत्र्यांचे अधिकार सचिवांना दिलेले नसून न्यायीक प्रकरणांबाबतचे अधिकारच सचिवांना दिले आहेत, याआधी राज्यात आणि देशातही बऱ्याच ठिकाणी असं झाल्याचं फडणवीस यांनी सांगितलं.
मंत्रिमंडळ विस्तार कधी होणार, असा प्रश्न देवेंद्र फडणवीस यांना विचारला असता, तुम्ही विचार करताय त्याच्याआधी मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं उत्तर फडणवीसांनी दिलं. तसंच सुप्रीम कोर्टाचा निकाल लागत नसल्यामुळे मंत्रिमंडळ विस्तार रखडलेला नसल्याचंही फडणवीस यांनी स्पष्ट केलं. सुप्रीम कोर्टाने कुठेही मंत्रिमंडळ विस्तार करू नका, असं म्हणलेलं नाही, असं फडणवीस म्हणाले.