वादग्रस्त वक्तव्यामुळे राज्यपालांना न बोलण्याचे आदेश ?

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । विरोधी पक्षाकडून राज्य सरकारकडे मंत्रिमंडळ विस्ताराबाबत सवाल उपस्थित केला जात असतानाच मध्येच राज्यपाल भगतसिंग कोश्यारी वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत येतात. काही दिवसांपूर्वी मंत्रिमंडळ विस्ताराबाबत चर्चा सुरू असताना राज्यपालांनी मुंबईबद्दल केलेल्या वक्तव्यामुळे विरोधकांची सर्व शक्ती राज्यपालांवर टीका करण्यात गेली.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनात राज्यपालांच्या हस्ते हर घर तिरंगा अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी प्रसारमाध्यमांनी त्यांच्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र राज्यपालांनी बोलण्यास थेट नकार दिला. मुख्यमंत्री उपस्थित आहे, त्यांच्याशी बोला असं ते यावेळी म्हणाले. याशिवाय, राज्यपालांना न बोलण्याचे आदेश दिले आहेत, असं कोश्यारी यावेळी म्हणाले. भाजपश्रेष्ठींकडून त्यांना न बोलण्याची सक्त ताकीद देण्यात आल्याचे दिसत आहे.

काही दिवसांपूर्वी राज्यपालांनी मुंबईबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं होतं. मुंबईतून जर गुजराती, राजस्थानी लोकांना काढून टाकलं तर आर्थिक राजधानी म्हणून मुंबई ओळखली जाणार नाही असं वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. अशात आता राज्यपालांनी यावर स्पष्टीकरण दिलं आहे. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक असल्याचं आता त्यांनी म्हटलं होतं.

नेहमीप्रमाणे माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला. महाराष्ट्राच्या उभारणीत मराठी माणसाच्या कष्टाचे योगदान सर्वाधिक आहेच. अलीकडे प्रत्येक बाबतीत राजकीय चष्म्यातून बघण्याची दृष्टी विकसित झाली आहे, ती आपल्याला बदलावी लागेल. एका समाजाचे कौतुक हा दुसऱ्या समाजाचा अपमान कधीही नसतो. कारण नसताना राजकीय पक्षांनी त्यावर वाद निर्माण करू नये, असंही ते यानंतर म्हणाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *