महाराष्ट्रानंतर आता बिहारमध्ये मोठा राजकीय भूकंप ? नितीश कुमार झाले सावध

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ७ ऑगस्ट । महाराष्ट्रात सत्तापालट झाल्यानंतर आता बिहारमध्येही राजकीय भूकंप होणार का अशी चिन्हं आता दिसू लागली आहेत. भाजपा आणि जदयूमध्ये सुरू असलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर बिहार सरकार अडचणीत येणार असल्याची चर्चा आहे. याचाच एक भाग म्हणजे आज जदयूचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदार, खासदारांची महत्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीत पक्ष मोठा निर्णय घेण्याची शक्यता आहे.

मिळालेल्या माहितीनुसार ‘राजद’च्या आमदारांनाही तेजस्वी यादव यांनी आपल्या पक्षाच्या सर्व आमदारांना राजधानी पाटणामध्येच राहण्यास सांगितलं आहे. भाजपासोबतच्या वादामुळे नितीश कुमार आता पुन्हा एकदा भाजपाची साथ सोडून ‘राजद’सोबत सत्ता स्थापन करणार असल्याचं बोललं जात आहे.

भाजपाच्या दोन महत्वाच्या नेत्यांनी बिहारमध्ये रोड शो केला, बैठकाही घेतल्या पण याकडे नितीश कुमार यांनी पूर्णपणे पाठ फिरवली. भाजपा नेत्यांनी आयोजित केलेल्या बैठका, माजी राष्ट्रपतींनी आयोजित केलेला स्नेहभोजनाचा कार्यक्रम, राष्ट्रपतींचा शपथविधी, निती आयोगाची बैठक अशा सर्व महत्वाच्या कार्यक्रमांना नितीश कुमार यांची अनुपस्थिती होती.

एका बाजूला भाजपा-जदयूमध्ये सारंकाही आलबेल नाही अशी चर्चा होत आहे. तर दुसरीकडे जदयूचे राष्ट्रीय ललन सिंह यांनी भाजपासोबत सुसंवाद असल्याचा दावा केला आहे. “भाजपासोबत ऑल इज वेल आहे. आम्ही केंद्रात कॅबिनेटमध्ये सहभागी होणार नाही. २०१९ मध्येच ठरलं होतं की जदयू केंद्रीय मंत्रिमंडळात सहभागी होणार नाही. जदयू विरोधात षडयंत्र रचली जात आहेत. पण त्याचा पक्षावर काहीच परिणाम होणार नाही. याआधी चिराग पासवान मॉडल आणला गेला. आता आणखी एक मॉडल आणण्याची तयारी केली जात आहे. पण जदयू विरोधात कोणतंच मॉडल यशस्वी होणार नाही”, असं ललन सिंह म्हणाले.

राजधानी दिल्लीत आज निती आयोगाची बैठक बोलवण्यात आली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीला नितीश कुमार अनुपस्थित होते. नितीश कुमारांच्या अनुपस्थितीमुळे अनेक सवाल उपस्थित केले जात आहेत. पण नितीश कुमार नुकतेच कोरोनातून बरे झाले आहेत. अजूनही त्यांची तब्येत पूर्णपणे बरी झालेली नाही. त्यामुळे ते बैठकीला अनुपस्थित होते असं सांगण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *