‘वाईन शॉप्स’ सुरु करून, राज्याला महसुलाचा ओघ सुरु होईल हे बघायला काय हरकत आहे? राज ठाकरे यांचा मुख्यमंत्री ठाकरेनां सवाल

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ – ऑनलाईन – मुंबई – कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता केंद्र सरकारने संपुर्ण देशात अत्यावश्यक सेवा वगळून लॉकडाऊन जाहिर केला आहे. त्यामुळे देशासह राज्याचे अर्थिक चक्र रोखले आहे. हे चक्र पुन्हा सुरू होण्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे राज्यातील ‘वाईन शॉप्स’ सुरु करायला काय हरकत आहे? असा सवाल केला आहे.राज ठाकरे यांनी राज्यामध्ये महसुलाचा ओघ सुरु करण्याच्या दृष्टीने राज्यातील वाईन शॉप सुरू करण्याचा सल्ला पत्राद्वारे दिला आहे. जवळपास १८ मार्च पासून राज्यात लॉकडाऊन आहे, आधी ३१ मार्च मग पुढे १४ एप्रिल आणि आता ३ मे आणि अजून किती दिवस पुढे ही परिस्थिती राहील ह्याची खात्री नाही. 

‘वाईन शॉप्स’ सुरु करा ह्याचा अर्थ दारू पिणाऱ्यांचा विचार करा असा नाही तर राज्याच्या घटत्या महसुलाचा विचार करा हा आहे. हा विषय निव्वळ राज्याच्या महसुलाचा आहे, जो पूर्ण आटला आहे. आज पेट्रोलपंप जवळपास बंद आहेत, राज्यातील जमिनींचे आणि स्थावर मालमत्तांचे व्यवहार ठप्प आहेत, आणि दारूवरच्या अबकारी शुल्कातून राज्याला दिवसाला ४१.६६ कोटी, महिन्याला १२५० कोटी आणि वर्षाला १५००० कोटी मिळतात. आता जवळपास राज्य ३५ दिवस टाळेबंदीत आहे आणि पुढे किती दिवस राहील ह्याचा अंदाज नाही ह्यावरून आपण किती महसूल गमावलाय आणि गमावू ह्याचा अंदाज येईल. असे स्पष्टीकरण देखील राज ठाकरे यांनी पत्रामध्ये दिले आहे.

तसेच, आज पोलिसांपासून ते आरोग्य सेवक, नर्सेस ह्या अनेकांकडे पीपीई किट्स नाहीत, लोकांना मोफत जेवण किंवा इतर काही पुरवायचं म्हणलं तर ताटातलं वाटीत आणि वाटीतलं ताटात करत राज्य सरकार दिवस ढकलतंय कारण त्यांची तिजोरी पण साफ झाली आहे. अगदी सरकारी कर्मचारी वर्गाला पगार द्यायलाही पैसे नाहीत ही परिस्थिती आहे. त्यामुळे ‘वाईन शॉप्स’तून मिळणारा महसूल हा मोठा आहे आणि आत्ता राज्याला त्याची नितांत गरज असल्याचे राज ठाकरे यांनी म्हटले आहे.

आधी राज्यात दारूबंदी होती आणि आता ती महसुलासाठी उठवा असे कोणी म्हणत नाही. टाळेबंदीच्या आधी दारूची दुकाने सुरूच होती म्हणून आता कुठल्याही नैतिक गुंत्यात न अडकता राज्य सरकारने निर्णय घ्यावा. ‘ताकाला जाऊन भांडं कशाला लपवायचं’ असा मराठी म्हणीचा संदर्भ देत राज ठाकरे यांनी राज्याला आत्ता महसुलाची गरज आहे हे वास्तव स्वीकारले पाहिजे. बाकी जे ह्या दुकानांमध्ये जातील त्यांना शारीरिक अंतर राखून खरेदी करायला लावणं इत्यादी गोष्टींसाठी कडक निकष लावता येतीलच.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *