महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १० ऑगस्ट । मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे यांच्यातील सत्तासंघर्षाची सुनावणी सुनावणी आता २२ ऑगस्ट रोजी होणार आहे. त्यामुळे सत्तासंघर्ष रेंगाळणार अशी चिन्हे आहेत. १२ ऑगस्ट रोजी ही सुनावणी पार पडणार होती. मात्र आता ती १० दिवस लांबणीवर पडली आहे. (Shinde-Thackeray news in Marathi)
आतापर्यंत शिंदे-ठाकरे वादासंदर्भातील पाच याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल आहेत. मात्र यावर अद्याप कुठलाही निर्णय झालेला नाही. त्यातच सरन्यायाधीश एन.व्ही. रमना हे २६ ऑगस्टला निवृत्त होणार आहेत. त्यामुळे शिंदे-ठाकरे वाद रेंगाळणार अशी शक्यता निर्माण झाली आहे.
केंद्र सरकारने देखील रमना यांना पुढील सरन्यायाधीश कोण असतील अशी विचारणा केली. त्यामुळे सध्या सुनावणी होत असलेल्या शिंदे-ठाकरे याचिकांवर परिणाम होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रमना यांच्या खंडपीठासमोर ठाकरे-शिंदे गटांच्या पाच याचिकांवर सुनावणी सुरू आहे. आतापर्यंत चार वेळा सुनावण्या झाल्या आहेत. मात्र कोणताही निर्णय झालेला नाही.
दरम्यान रमना यांनी न्यायमूर्ती उमेश ललित यांच्या नावाची शिफारस केली होती. त्यानुसार पुढील सरन्यायाधीश पदासाठी उमेश ललित यांचं नाव निश्चित झालं आहे. एकूणच न्यायालयात सध्या तारीख पे तारीख सुरू आहे. तर रमना यांनी देखील ठाकरे-शिंदे गट प्रकरण पाच सदस्यीय खंडपीठाकडे सोपविण्याचे सुतोवाच केले आहे. त्यामुळे २२ ऑगस्ट रोजी होणाऱ्या सुनावणीत ठोस निकाल लागतो की, हे प्रकरण पाच सदस्यीय खंडपीठाकडे वर्ग केले जाते, हे पाहणे औत्सुक्याचं ठरणार आहे.