भाजपकडून खातेवाटप करताना पु्न्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब केला जाणार का ? गृह खातं शिंदे गटाला मिळणार का ?

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. ११ ऑगस्ट । शिंदे-फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार पडल्यानंतर आता प्रत्येकालाच खातेवाटपाची उत्सुकता लागून राहिली आहे. कालपर्यंत राजकीय वर्तुळात मंत्रिमंडळातील बहुतांश मलाईदार खाती भाजपच्या वाट्याला जातील, अशी चर्चा होती. याउलट शिंदे गटाच्या आमदारांना त्यांची जुनी खातीच पुन्हा मिळतील, अशी चर्चा होती. त्यामुळे शिंदे गटाच्या (Eknath Shinde Camp) आमदारांनी एवढं मोठं बंड करून नेमकं काय साध्य केलं, असा प्रश्न विचारला जात होता. परंतु, अशातच देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या एका एक सूचक वक्तव्याने सर्वांचे कान टवकारले गेले होते. प्रसारमाध्यमांनी आमच्या आधीच खातेवाटप करून टाकले आहे. मात्र हे सर्व अंदाज पूर्णपणे चुकणार असल्याचा दावा फडणवीस यांनी केला होता. (Maharashtra Cabinet Expansion)

त्यामुळे भाजपकडून खातेवाटप करताना पु्न्हा एकदा धक्कातंत्राचा अवलंब केला जाणार का, असे अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. त्यामुळे गृह आणि अर्थ या दोन महत्त्वाच्या खात्यांपैकी एक खाते शिंदे गटाच्या वाट्याला जाऊ शकते, अशी अटकळ बांधली जात आहे. यापूर्वी शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी अर्थ खात्याचे राज्यमंत्रीपद भुषविले होते. माझ्या या अनुभवाचा उपयोग करून घ्यावा, असे सूचक वक्तव्यही त्यांनी अलीकडेच केले होते. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारमध्ये दीपक केसरकर यांना अर्थमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. राष्ट्रवादीकडे असलेल्या अर्थखात्याकडून आम्हाला निधी दिला जात नाही, असा एकनाथ शिंदे गटाच्या बहुतांश आमदारांचा आक्षेप होता. त्यामुळे शिंदे गटाकडेच अर्थमंत्रीपद देऊन ही समस्या कायमची मिटवावी, अशी भाजपची रणनीती असू शकते.

आतापर्यंत समोर आलेल्या माहितीनुसार,देवेंद्र फडणवीस यांच्याकडे वित्त तसेच गृह खाते दिले जाण्याची शक्यता होती. मंत्रिमंडळात गृह खाते हे मुख्यमंत्रीपदानंतर दुसऱ्या क्रमांकाचे खाते मानले जाते. हे खाते हातात असणाऱ्या मंत्र्याला राजकीयदृष्ट्या संवेदनशील असलेल्या प्रकरणांच्या कारवाईचे निर्णय घेतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस हे खाते स्वत:कडेच ठेऊन आपला वचक कायम ठेवतील, अशी चर्चा होती. मात्र, देवेंद्र फडणवीस यांच्याच वक्तव्यानंतर या समीकरणाच पुनर्विचार केला जात आहे. यामध्ये देवेंद्र फडणवीस अर्थ आणि गृह या दोन्ही खात्यांचा कारभार स्वत:कडेच ठेवणार नाहीत, असा अंदाज बांधला जात आहे. ही दोन्ही खाती महत्त्वाची असून प्रत्येक खात्यासाठी स्वतंत्र मंत्री असणे गरजेचे आहे. गेल्या टर्ममध्ये देवेंद्र फडणवीस यांनी गृह खाते आपल्याकडे ठेवले होते. तेव्हा देवेंद्र फडणवीस हे गृह खात्याला पूर्णपणे न्याय देऊ शकत नाहीत, अशी ओरड सुरु असायची. गृह खात्याला स्वतंत्र मंत्री द्यावा, अशी मागणीही त्यावेळी झाली होती. त्यामुळे फडणवीस आतादेखील गृह आणि अर्थ खातं सांभाळण्याची दुहेरी करसत करणारी नाहीत, अशी चर्चा आहे.

तसेच शिंदे गटाला गृह खाते देण्यामागे भाजपची आणखी एक रणनीती असू शकते. आगामी काळात शिवसेना आणि शिंदे गटात रस्त्यावरती संघर्ष होऊ शकतो. महापालिका निवडणुकांच्या काळात स्थानिक पातळीवरील हा संघर्ष टिपेला पोहोचेल. त्यावेळी अनेक राजकीय गुन्हे दाखल होऊ शकतात. त्यासंदर्भात उद्धव ठाकरे गटाच्या शिवसैनिकांवर अटकेची किंवा अन्य कोणती कठोर कारवाई करण्याची वेळ येऊ शकते. अशावेळी गृहमंत्रीपद हे माजी शिवसैनिकाकडेच असणे, हे भाजपसाठी सोयीस्कर ठरेल. जेणेकरून भाजपकडून यंत्रणा वापरून शिवसेनेला संपवले जात आहे, असा आरोप करता येणार नाही. त्यामुळे भाजपला नामनिराळे राहता येईल. या दृष्टीकोनातून एकनाथ शिंदे यांच्याकडे गृहमंत्रीपद असणे, ही बाब भाजपसाठी फायदेशीर ठरू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *