लॉकडाऊनमधून बाहेर पडण्यापूर्वी सरकारसमोर चिंता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४- ऑनलाईन – मुंबई : देशाच्या विविध भागात विद्यार्थी आणि मजूर अडकून आहेत. लॉकडाऊन उठवताच मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची भीती आहे. तर दुसरीकडे सरकारला अर्थव्यवस्था खुली करणं आवश्यक आहे. त्यामुळे सध्या ३ मे नंतरचं नियोजन करण्यासाठी मोठी कसरत करावी लागत आहे. लॉकडाऊन ३ मेपर्यंत असला तरी त्यानंतर काय करायचं यावर केंद्र सरकार गांभीर्याने विचार करत आहे. कारण, लॉकडाऊन अचानक उठवणं हे धोक्याचं असेल. या लॉकडाऊनमधून जेवढं कमावलं तेवढंही गमावलं जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे वरिष्ठ मंत्री यावर काम करत आहेत. एका सरकारी अधिकाऱ्याच्या मते, ‘लॉकडाऊन लागू करणं सोपं असतं, एका क्षणात सगळं काही बंद करता येतं. पण लॉकडाऊन मागे घेणं कठीण असतं. व्यवस्थेलाही यासाठी तयारी करावी लागते. यावर कोणताही उपाय नाही.’

करोनाचा प्रसार रोखण्यासाठी २५ मार्च रोजी तीन आठवड्यांच्या राष्ट्रीय लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली. करोनाचा प्रसार वाढतच होता हे पाहून पुन्हा हे लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आलं. केंद्र सरकारने २० एप्रिलपासून काही प्रमाणात अर्थव्यवस्था खुली केली आहे. पण सर्व अर्थव्यवस्था खुली कशी करायची यासाठी केंद्र सरकार दररोज आढावा घेत आहे. सर्वात मोठा अडथळा म्हणजे अर्थव्यवस्थेचं केंद्र असलेले शहरंच हॉटस्पॉट आहेत. त्यामुळे या भागात अगोदर रोगावर मात करणं आवश्यक असल्याचं अधिकारी सांगतात.

अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, ‘देशाचं विभाजन हॉटस्पॉट आणि बिगर हॉटस्पॉट असं करण्यात आलं आहे. बिगर हॉटस्पॉटमध्ये आर्थिक व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. आपण कितीही प्रयत्न केले तरी उद्योगांचे केंद्रच सध्या हॉटस्पॉट बनलेले आहेत. त्यामुळे करोनाचा प्रसार कमी होत नाही तोपर्यंत काहीही करता येणार नाही.’ स्थानिक स्तरावर अनेक समस्या आहेत, ज्या सोडवणं गरजेचं आहे. ग्रामीण भागात परवानगी देण्यात आली आहे, पण कामकाज सुरू करण्यापूर्वी जिल्हाधिकाऱ्यांची परवानगी आवश्यक आहे. गुजरातमध्ये उद्योगांना परवानगी देण्यात आली आहे. दररोज त्यांना पास दिले जातात. पण काही उद्योग कमी मनुष्यबळासह सुरू करणं शक्य नाही, असंही अधिकारी सांगतात.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *