मृत्यू नंतरही यातनादायी अंत्यप्रवास आ. वडेट्टीवार यांच्या गावातुन पुराच्या पाण्यातून निघाली अंत्ययात्रा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १२ ऑगस्ट । ”इतकेच मला जातांना सरणावर कळले होते, मरणाने केली सुटका जगण्याने छळले होते”, ही कविवर्य सुरेश भट यांची लोकप्रिय कविता. जिवंतपणी भोगलेल्या यातनांतून मृत्यूमुळे सुटका झाल्याचा या ओळींचा अर्थ. मात्र, याविपरीत अनुभव चंद्रपूर जिल्ह्यात आला. माजी मंत्री, काँग्रेस नेते आ. विजय वडेट्टीवार यांच्या जन्मगावातील एका तरुणाचा मरणानंतरचा अंत्यप्रवासही यातनादायी ठरला.

सर्वाधिक प्रेमविवाह करणारे गाव म्हणून करंजी गाव प्रसिद्ध आहे. आ. वडेट्टीवार यांच्या करंजी या जन्मगावातून काँग्रेसने ‘तिरंगा गौरवयात्रा‘ काढली. मात्र, याच गावाला पुराचा फटका बसल्याने एका तरुणाची अंत्ययात्रा पुराच्या पाण्यातून काढावी लागली. पुराच्या पाण्यातून निघालेल्या या अंत्ययात्रेची राज्यात सर्वत्र चर्चा सुरू आहे.

एकीकडे, काँग्रेसची ‘तिरंगा गौरवयात्रा‘ मोठ्या उत्साहात निघाली. यात्रेत करंजीचे भूमिपुत्र माजी मंत्री विजय वडेटटीवार, आ. सुभाष धोटे, आ. प्रतीभा धानोरकर, ग्रामीण काँग्रेस अध्यक्ष प्रकाश देवतळे सहभागी झाले होते. चिंब पावसात नेते आणि कार्यकर्ते मंडळी ढोल-ताशांच्या तालावर नाचतगाजत निघाले. आक्सापूर-पोंभुर्णा असा त्यांचा प्रवास सुरू होता. दुसरीकडे, त्याचवेळी करंजीतील रवी आत्राम (३०) या तरुणाचा मृत्यू झाला. आत्राम कुटुंबीयांना त्याच्यावर अंत्यसंस्कार करताना अक्षरशः देव आठवले. साधारणतः चार फूट पाण्यातून मार्गक्रमण करीत, प्रचंड यातना सहन करीत तरुणावर अंत्यसंस्कार पार पडले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *