शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच पोहरादेवीच्या दौऱ्यावर जाण्याची शक्यता

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । शिवसेना पक्षात अभूतपूर्व फूट पडल्यानंतर पक्ष वाचवण्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे प्रयत्न सुरू आहेत. मागील काही निवडणुकीत शिवसेनेच्या पाठिशी असणारा बंजारा समाज दुरावू नये यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहरादेवीमध्ये येण्याची शक्यता आहे. पोहरादेवीमध्ये उद्धव ठाकरे धर्मगुरु बाबुसिंग महाराज, महंतांची भेट घेण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वीच शिवसेनेचे बंडखोर आमदार आणि मंत्री संजय राठोड पोहरादेवीत आले होते

शिवसेनेतून बंड करून शिंदे गटात सामिल झालेले आमदार आणि विद्यमान मंत्री संजय राठोड हे उद्धव ठाकरे यांच्या मंत्रिमंडळात मंत्री होते. मात्र, पूजा चव्हाण हिच्या आत्महत्येप्रकरणी संजय राठोड यांना राजीनामा द्यावा लागला होता. विरोधी पक्ष भाजपने या प्रकरणी आरोपही केले होते. त्यानंतर शिंदे गट आणि भाजपने स्थापन केलेल्या सत्तेत संजय राठोड पुन्हा एकदा मंत्री झाले आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात संजय राठोड यांना पुन्हा मंत्रिमंडळात घेण्यासाठी बंजारा समाजाने मोर्चा काढला होता. सरकारमध्ये राठोड यांचा समावेश करण्यासाठीच्या हालचालीदेखील सुरू झाल्याचे वृत्त होते. त्यावेळीही भाजप नेत्यांनी राठोड यांना विरोध केला होता.

शिवसेनेतील फुटीनंतर पक्षाच्या पुनर्बांधणीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे लवकरच राज्याच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दरम्यान पोहरादेवीला ते भेट देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली. शिवसेनेचे मुंबईतील काही पदाधिकारी पोहरादेवीला दाखल झाले आहेत. पोहरादेवीच्या दर्शननंतर उद्धव ठाकरे हे रामराव महाराज स्मृतीस्थळ, संत सेवालाल महाराज, जगदंबा देवीच्या दर्शनाला उपस्थित राहणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. दोन दिवसांपूर्वीच बंजारा समाजाचे नेते मंत्री संजय राठोड यांनी शक्तिप्रदर्शन केले होते. त्यामुळे आता बंजारा समाज शिवसेनेशी दूर जाऊ नये म्हणून स्वतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे पोहरादेवीत येणार असल्याची चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *