महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १६ ऑगस्ट । टीम इंडिया 3 वनडे सामन्यांच्या मालिकेसाठी झिम्बाब्वे दौऱ्यावर गेली आहे. 18 ऑगस्टपासून दोन्ही देशांमधील मालिका सुरू होणार आहे. याआधी टीम इंडियासमोर आणखी एक समस्या निर्माण झाली आहे. सध्या हरारेमध्ये जलसंकट सदृश्य परिस्थिती आहे. राजधानी हरारेतील अनेक भागात गेल्या तीन दिवसांपासून पाणी येत नाही. पिण्याच्या पाण्यासाठीही नागरिकांना तासनतास रांगेत उभे राहावे लागत आहे.
पाण्याचे गंभीर संकट असताना अशा परिस्थितीत बीसीसीआयने टीम इंडियाचा कर्णधार केएल राहुल आणि इतर खेळाडूंना पाण्याची जास्तीत जास्त बचत करण्यास आणि आंघोळीसाठी कमी पाणी वापरण्यास सांगितले आहे. 2018 मध्ये दक्षिण आफ्रिका दौऱ्यात भारतीय संघाला अशाच परिस्थितीचा सामना करावा लागला होता. त्यानंतर केपटाऊनच्या अनेक भागात पाण्याचे संकट निर्माण झाले. त्यानंतरही बीसीसीआयने खेळाडूंना कमीत कमी पाणी वापरण्यास सांगितले होते.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, होय हरारेमध्ये पाण्याची परिस्थिती गंभीर आहे. खेळाडूंना माहिती देण्यात आली आहे. कमीत कमी वेळेत आंघोळ करण्यास सांगण्यात आले आहे. याशिवाय पाणी बचतीसाठी संघाच्या पूल सत्रात कपात करण्याचा निर्णयही घेण्यात आला आहे. झिम्बाब्वेची राजधानी असलेल्या हरारेला दरवर्षी पाणीटंचाईचा सामना करावा लागतो. तीन वर्षांपूर्वी येथील परिस्थिती इतकी बिकट झाली होती की, लोकांना सांडपाणीही वापरावे लागत होते.
ज्या ठिकाणी पाणी येत आहे, तेथेही घाण पाणी येत असल्याच्या तक्रारी नागरिक करत आहेत. गेल्या महिन्यात तर परिस्थिती आणखी बिकट होती. 2016 च्या झिम्बाब्वे दौऱ्यात भारतीय संघ ज्या हॉटेलमध्ये थांबला होता, त्या हॉटेलमध्ये पाहुण्यांना पिण्यासाठीही पाणी नव्हते. मात्र, सध्या भारतीय संघाला अशी परिस्थिती आली नाही.