महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १७ ऑगस्ट । शिंदे सरकार आपल्या पहिल्या वहिल्या पावसाळी अधिवेशनाला (Maharashtra Assembly Monsoon Session ) सामोरं जात आहे. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी करून परिसर दणाणून सोडला. यावेळी ’50 खोके…एकदम ओके’ अशी घोषणाबाजी विरोधकांनी केली. याघोषणाबाजीवर मुख्यमंत्री शिंदे (cm ekanth shinde) यांनीही हसून दाद दिली.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेमध्ये बंडखोरी करून वेगळा गट स्थापन केला. 39 आमदारांना फोडून शिंदे यांनी सुरत व्हाया गुवाहाटी गाठले होते. शिंदे गुवाहाटीला पोहोचले तेव्हा त्यांच्या गटात एक एक करून शिवसेनेचे अनेक मंत्री आणि आमदार गटात सामील झाले होते. या आमदारांना 50 कोटी रुपये देण्याची आल्याची चर्चा रंगली होती. हाच धागा पकडून विरोधकांनी अधिवेशनात जोरदार घोषणाबाजी केली.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी एकत्र जमून शिंदे सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळी ’50 खोके…एकदम ओके, ईडी सरकार हाय हाय’ अशा घोषणा दिल्यात. यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उत्पादन मंत्री शंभूराजे देसाई हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी चालले होते. त्यामुळे विरोधकांनी ’50 खोके एकदम ओके’ जोरजोरात घोषणाबाजी सुरू केली. यावेळी शंभू राजे देसाई यांनीही ‘पाहिजे का?’ असं म्हणून विरोधकांना उत्तर दिलं.
विधानसभेच्या पायऱ्यांवर घोषणाबाजीनंतर सभागृहामध्ये विरोधकांनी जोरदार घोषणाबाजी केली. शिंदे यांनी राष्ट्रपतींच्या अभिनंदनाचा प्रस्ताव सादर केला. तर विरोधकांची स्थगन प्रस्ताव सादर करण्याची मागणी होती. पण, ती मागणी विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावली. त्यामुळे विरोधकांनी पुन्हा एकदा घोषणाबाजी करून गोंधळ घातला.