Maharashtra Rain : राज्यात या ठिकाणी पावसाचा येलो अलर्ट ; तर विदर्भात विजांसह पावसाचा इशारा

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. १८ ऑगस्ट । राज्यात पुढच्या दोन दिवसांत जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य भारतातील कमी दाब क्षेत्रामुळे विदर्भापाठोपाठ, उत्तर महाराष्ट्र, मुंबई, उत्तर कोकणात जोरदार पावसाने हजेरी लावली आहे. (Maharashtra Rain) आज (ता. 18) राज्यातील पावसाचा जोर काहीसा ओसरण्याची चिन्हे आहेत. पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ आहे. विदर्भात विजांसह पावसाची, तर उर्वरित राज्यात हलक्या पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.

राज्यातील पुणे जिल्ह्यात पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला आहे तर विजांसह पावसाचा इशारा बुलढाणा, अकोला, वर्धा, वाशीम, अमरावती, वर्धा, नागपूर, चंद्रपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यात देण्यात आला आहे. दरम्यान कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात किरकोळ पाऊस होणार आहे. कोकणात पावसाची शक्यता असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले.

कमी दाबाचा पट्टा राजस्थानच्या जैसलमेरपासून तीव्र कमी दाब क्षेत्र ते अग्नेय बंगाल उपसागरापर्यंत कायम आहे. पुढच्या दोन ते तीन दिवसांत पाऊस उत्तरेकडे जाण्याचे संकेत आहेत. दक्षिण गुजरात ते महाराष्ट्राच्या किनारपट्टीला समांतर कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे.

मध्य भारतातील कमी दाब क्षेत्र पूरक ठरल्याने विदर्भ, मध्य महाराष्ट्रासह उत्तर कोकणात पावसाने दणका दिला आहे. मंगळवारी विदर्भात पाऊस ओसरला होता. तर उत्तर महाराष्ट्र आणि कोकणात पाऊस वाढल्याचे दिसून आले. मध्य महाराष्ट्रात कमी-अधिक स्वरूपात श्रावण सरी कोसळत आहेत. आज (ता. 18) पुणे जिल्ह्याच्या घाटमाथ्यावर तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा ‘यलो अलर्ट’ देण्यात आला आहे. तर विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे.

उत्तर छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश परिसरावरील तीव्र कमी दाब क्षेत्र (डिप्रेशन) मंगळवारी पूर्व राजस्थान आणि पश्चिम मध्य प्रदेशावर होते. या प्रणालीची तीव्रता ओसरण्यास सुरूवात झाली आहे. ईशान्य अरबी समुद्रात चक्राकार वाऱ्यांची स्थिती उ आहे. शुक्रवारपर्यंत (ता. 19) उत्तर बंगालच्या उपसागरात नव्याने कमी दाब क्षेत्राची निर्मिती होण्याचे संकेत आहेत.

नागपूर विभागामध्ये गेल्या 24 तासात पडलेल्या पावसामुळे भंडारा, गोंदिया व गडचिरोली या जिल्ह्यामध्ये पूरपरिस्थिती निर्माण झाली असून गडचिरोली जिल्ह्यातील 18 तर भंडारा जिल्ह्यातील 78 रस्ते पुराच्या पाण्यामुळे वाहतुकीकरिता बंद करण्यात आले आहेत. या भागात स्थानिक शोध व बचाव पथकामार्फत मदतकार्य सुरु आहे. राज्यात अन्यत्र मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु असून मंत्रालय नियंत्रण कक्ष राज्यातील सर्व जिल्हा नियंत्रण कक्षांच्या सातत्याने संपर्कात आहे.

राज्यात कोकण, पुणे, नाशिक, औरंगाबाद व अमरावती या विभागात कमी ते मध्यम स्वरुपाचा पाऊस असून कुठेही गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झालेली नाही.

गोंदिया जिल्ह्यात दि14 ते 16 ऑगस्ट या कालावधीत गोंदिया जिल्हा तसेच मध्यप्रदेश राज्याच्या सीमावर्ती भागात सरासरी 173.5 मि.मी. हून अधिक पाऊस झाल्याने तसेच वैनगंगेच्या बाघ उपनदीवरील शिरपूर व पुजारीटोला या धरणातून चालू असणाऱ्या विसर्गामुळे वैनगंगा नदी पाणी पातळीत वाढ झाली. यामुळे गोंदिया जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती निर्माण झाली होती. मात्र सद्यस्थितीत पूर परिस्थिती नियंत्रणात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *