महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २२ ऑगस्ट । आज श्रावण महिन्याचा चौथा आणि शेवटचा सोमवार महादेवाचा लाडका श्रावण महिना आता संपत आला आहे. 27 ऑगस्टला श्रावण महिना संपेल आणि भाद्रपद (Bhadrapad 2022) महिना सुरू होईल. भोलेनाथाच्या भक्तीसाठी श्रावण सोमवार हा अतिशय उत्तम मानला जातो. असे मानले जाते की, या दिवशी व्रत ठेऊन खऱ्या मनाने रुद्राभिषेक (Rudrabhishek) केल्यास सर्व सुख प्राप्त होते. रुद्राभिषेक म्हणजे भगवान रुद्राचा अभिषेक, म्हणजेच मंत्राने शिवलिंगाचा अभिषेक. श्रावणमध्ये भोलेनाथाचा रुद्राभिषेक करता येत नसेल, तर श्रावणच्या शेवटच्या सोमवारी रुद्राभिषेक करून भोलेनाथांचा आशीर्वाद घेण्याची संधी आहे. सोमवारी शिवाचा रुद्राभिषेक केल्याने सर्व रोग नष्ट होतात आणि ग्रह दोषांपासून (Grah Dosh Upay) मुक्ती मिळते, असे सांगितले जाते.
आजची शिवमूठ
आजची शिवमूठ जव आहे. यंदा श्रावण महिन्यात चार श्रावण सोमवार आले आहेत. पहिल्या सोमवारी तांदूळ हे शिवमूठ होते. दुसऱ्या सोमवारी तीळ, तिसऱ्या सोमवारी मूग आणि चौथ्या व शेवटच्या सोमवारी जव ही शिवमूठ आहे. महादेवाची पूजा करीत असताना पूजेच्या वेळी शिवमूठ अर्पण केल्याने विशेष फळ मिळते. शिवमूठ अर्पण करून महादेवाला 108 बेलपत्र वाहावे व ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करावा.
या दिवशी तोडू नये बेलची पाने
चतुर्थी, अष्टमी, नवमी, चतुर्दशी आणि अमावस्या तिथीला बेलची पाने तोडू नयेत. तसेच संक्रांतीच्या काळात आणि सोमवारी बेलची पाने तोडू नयेत. यासाठी डहाळीसह बेलपत्रही तोडू नये. डहाळीहून निवडून केवळ बेलपत्र तोडले पाहिजे, कधीही पूर्ण डगाळ तोडू नये. पत्री तोडताना झाडाला हानी होता कामा नये. बेलपत्र तोडण्यापूर्वी आणि नंतर झाडाला मनात प्रणाम करावे. महादेवाला बेलपत्र नेहमी उलटं अर्पित करावं अर्थात पानाचा गुळगुळीत भाग शिवलिंगाच्या वरच्या भागाला असावा. बेलपत्रात चक्र आणि वज्र नसावे. बेलपत्र 3 ते 11 दल या प्रकारे असतात. जितके अधिक दल असतील तितकं उत्तम मानले जाते. बेलपत्र उपलब्ध नसल्यास बेलाच्या झाडाचे दर्शन मात्र पाप नष्ट करण्यासाठी पुरेसं आहे. शिवलिंगावर इतर कोणी अर्पित केलेल्या बेलपत्राची उपेक्षा किंवा अपमान करणे योग्य नाही.