महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २३ ऑगस्ट । यूएईमध्ये २७ ऑगस्टपासून आशिया चषक सुरू होत आहे. मात्र, २८ ऑगस्ट रोजी होणाऱ्या भारत-पाकिस्तान सामन्याची सर्वांना प्रतीक्षा आहे. कारण भारत व पाकिस्तानचा सामना कोणत्याही स्पर्धेत असो, तो एका युद्धाप्रमाणे बघितला जातो. बाह्य दबाव असताना मैदानावरही दोन्ही संघांचे खेळाडू एकमेकांशी वाद घालताना अनेकदा दिसले. ४० वर्षांच्या इतिहासात पाक खेळाडूंनी मैदानावर भारतीय खेळाडूंना डिवचले, पण त्यांना भारतीयांकडून सडेतोड उत्तरही मिळाले. जाणून घेऊया दोन्ही संघातील खेळाडूंच्या वादाबाबत…
किरण मोरे vs जावेद मियांदाद
सिडनी येथील १९९२ विश्वचषक स्पर्धेतील सामन्यात पाकिस्तान धावांचा पाठलाग करत होता व खेळपट्टीवर मियांदाद होता. यष्टीरक्षक किरण मोरे त्याला सातत्याने टोमणे मारत होता. सचिनच्या एका चेंडूवर मोरेने यष्टीचितचे अपील केले, पण अंपायरने आउट दिले नाही. असे असतानाही मोरे यष्टीमागे सातत्याने टोमणे मारत होता. पाकिस्तानने हा सामना ४३ धावांनी गमावला होता.
वेंकटेश प्रसाद vs आमिर सोहेल
बंगळुरूत १९९६ मधील विश्वचषकातील उपांत्य सामन्यात वसीम अक्रम जखमी झाल्याने सोहेल कर्णधार होता. पाकिस्तान धावांचा पाठलाग करत होता. वेंकटेश गोलंदाजीला आला तेव्हा सोहेलने चौकार मारला व पुन्हा त्याच ठिकाणी चेंडू टोलवण्याचा इशारा वेंकटेशला दिला. मात्र, याच्या उलट झाले. वेंकटेशच्या पुढच्या चेंडूवर सोहेल त्रिफळाचित झाला. त्यानंतर वेंकटेशने त्याच अंदाजात त्याला मैदानाच्या बाहेर जाण्याचा इशारा दिला. या सामन्यात पाकिस्तान १०८ धावांनी पराभूत झाला होता.
वीरेंद्र सहवाग-शोएब अख्तर
२००४ मध्ये भारताच्या पाकिस्तान दौऱ्यात सेहवाग चांगल्या फॉर्मात होता. त्याने मुल्तानमध्ये पहिल्या कसोटीत तिहेरी शतक ठोकले होते. या डावात सेहवागने अख्तरची गोलंदाजी ठोकून काढली होती. तो लागोपाठ बाउंसर टाकायचा आणि सेहवाग टोलवायचा. त्याला चिथावण्यासाठी अख्तर म्हणाला, तू २०० पेक्षा जास्त धावा काढल्या आहेत. मी इतका बाउंसर टाकेल की, कमीत कमी एक पूल शॉट तरी मारून दाखव. सेहवाग तत्काळ म्हणाला, तू गोलंदाजी करत आहेस की भीक मागत आहेस? हाच बाउंसर सचिनला टाकण्याचा प्रयत्न कर.
गौतम गंभीर vs शाहिद आफ्रिदी
२००७-०८ मालिकेदरम्यान कानपूर वनडेत गंभीरने आफ्रिदीच्या चेंडूवर चौकार मारला असता आफ्रिदी चिडून गंभीरकडे पाहत काहीतरी बोलला. पुढच्याच चेंडूवर धाव घेताना गंभीर त्याला धडकला. यामुळे त्याचा कोपर आफ्रिदीला लागला. आफ्रिदी जाणूनबुजून त्याच्यासमोर आल्याचे गंभीरला वाटले. नंतर दोघांमध्ये खूप वाद झाला. अखेर अंपारयने दोन्ही खेळाडूंना एकमेकांपासून वेगळे केले.
गौतम गंभीर vs कामरान अकमल
२०१० मधील आशिया चषकादरम्यान दांबुला येथे गंभीर फलंदाजी करत होता तेव्हा यष्टीमागे कामरान वारंवार अपील करत गंभीरचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न करत होता. एकदा अकमलचे झेलबादचे अपील अंपायरने फेटाळलेही होते. तरीही अकमल मानण्यास तयार नव्हता तेव्हा गंभीरसोबत त्याचा वाद झाला. गंभीरने रागाच्या भरात अकमलला शिवी दिली. प्रकरण वाढले आणि अंपायर व धोनी यांना मध्यस्थी करावी लागली.