महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । एकीकडे महागाई दराची आकडेवारी सर्वसामान्यांना दिलासा देत आहे. RBI देखील येत्या काळात महागाई स्थिर राहण्याचा विश्वास व्यक्त करत आहे. मात्र दुसरीकडे धान्यांच्या दरांच्या किमती वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. गव्हापाठोपाठ आता तांदळाचे दरही पुरवठा चिंतेमुळे वाढू लागले आहेत. तांदळाची भारतीय सरासरी किरकोळ किंमत गेल्या वर्षीच्या याच कालावधीच्या तुलनेत 6.31 टक्क्यांनी वाढून 37.7 रुपये प्रति किलो झाली आहे. एका सरकारी आकडेवारीतून ही माहिती समोर आली आहे.
तांदळाच्या किरकोळ किमतीत वाढ ही चालू खरीप हंगामात देशाच्या उत्पादनात संभाव्य घसरणीच्या बातम्यांच्या पार्श्वभूमीवर आहे. कारण गेल्या आठवड्यापर्यंत भात पेरणी 8.25 टक्क्यांनी कमी झाली आहे. तज्ज्ञांनी सांगितले की, देशाचे एकूण तांदूळ उत्पादन 2022-23 (जुलै-जून) च्या खरीप हंगामासाठी 112 दशलक्ष टनांच्या उद्दिष्टापेक्षा कमी पडण्याची शक्यता आहे. एबीपी न्यूजने याबाबतचं वृत्त प्रसारित केलं आहे.
कृषी मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, या खरीप हंगामात 18 ऑगस्टपर्यंत 343.70 लाख हेक्टर क्षेत्रात धानाची पेरणी झाली आहे, जी गेल्या वर्षीच्या याच कालावधीत 374.63 लाख हेक्टर होती. भात हे खरीपाचे मुख्य पीक आहे, ज्याची पेरणी जूनमध्ये नैऋत्य मान्सूनच्या प्रारंभापासून सुरू होते. देशातील एकूण तांदूळ उत्पादनापैकी सुमारे 80 टक्के उत्पादन खरीप हंगामातून मिळते.
तांदळाच्या किरकोळ किमतीत झालेली वाढ ही गव्हाइतकी नाही कारण केंद्राकडे 3.96 लाख टनांचा प्रचंड साठा आहे आणि या साठ्याचा वापर किमतीत तीव्र वाढीच्या वेळी हस्तक्षेप करण्यासाठी करू शकतो.
ग्राहक व्यवहार मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, गव्हाची ऑल इंडिया सरासरी किरकोळ किंमत 22 ऑगस्ट रोजी जवळपास 22 टक्क्यांनी वाढून 31.04 रुपये प्रति किलो झाली आहे, जी मागील वर्षी याच कालावधीत 25.41 रुपये प्रति किलो होती. गेल्या वर्षी याच कालावधीत गव्हाच्या पिठाच्या सरासरी किरकोळ किमतीत 30.04 रुपये प्रति किलोवरून 17 टक्क्यांहून अधिक वाढ होऊन ती 35.17 रुपये प्रति किलो झाली आहे.