‘बाळासाहेबांच्या विचारांपासून ते कधीच दूर झाले नाही’; शिंदे गटाकडून राज ठाकरेंचं कौतुक

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २४ ऑगस्ट । वारसा हा वास्तूचा नाही तर विचारांचा असतो, मला बाळासाहेब ठाकरे यांचा विचार पुढे न्यायचा आहे, असं मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी सांगितलं. मनसेचा मंगळवारी मुंबईत मेळावा झाला. त्यावेळी राज ठाकरेंनी विविध विषयांवर भाष्य केलं.

माझ्याकडे निशाणी असली काय आणि नसली काय, नाव असलं काय आणि नसलं काय. याने काही फरक पडत नाही. माझ्याकडे विचार आहे. सगळ्यात मौल्यवान गोष्ट असेल तर ती म्हणजे विचार. बाकीचं सोडा त्याबाबतीत मी श्रीमंत आहे, असं सांगत माझ्या आजोबांचा, माननीय बाळासाहेबांचा विचार मला पुढे न्यायचा आहे, असे राज ठाकरे म्हणाले.

राज ठाकरेंच्या या विधानानंतर शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांनी कौतुक केलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे बाळासाहेबांचे विचार घेऊन बाहेर पडले. राज ठाकरे शिवसेनेतून बाहेर पडले, मात्र ते बाळासाहेबांच्या विचारांपासून कधीच दूर झाले नाही. हिंदुत्त्वाच्या मुद्यावर ज्याप्रमाणे राज ठाकरे आपली भूमिका मांडत आहेत, तो खरा वारसा बाळासाहेब ठाकरेंचाच असल्याचं दीपक केसरकरांनी सांगितलं.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं नाव न घेता दीपक केसरकरांनी टीका केली आहे. कोणी बाळासाहेबांच्या विचारांपासून दूर जात असेल, तर त्यांनी विचार करण्याची गरज आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडे मतांसाठी राजकारण करण्याशिवाय पर्याय नाही, असंही दीपक केसरकर यांनी म्हटलं आहे. दीपक केसरकरांनी आज पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

मी बाळासाहेबांना सांगून शिवसेनेतून बाहेर पडलो. शिवसेनेतून बाहेर पडतोय हे सांगण्यासाठी मी बाळासाहेबांकडे गेलो होतो. तेव्हा तिथे मनोहर जोशी उपस्थित होते. ते खोलीच्या बाहेर गेले. मनोहर जोशी बाहेर गेल्यानंतर तिथे मी आणि बाळासाहेब ठाकरे असे दोघेच होतो. तेव्हा बाळासाहेबांनी हात पसरले. मला मिठीत घेतले आणि म्हणाले की आता जा. मी दगाफटका करून बाहेर पडलो नाही. तुमच्या विश्वासावर बाहेर पडलो. तुमच्या विश्वासावर पक्ष उभा केला, असे राज ठाकरे म्हणाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *