‘स्पेशल 26’ स्टाईलने विक्रोळीत व्यावसायिकाच्या घरावर आयटीची धाड

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । ‘स्पेशल 26’ सिनेमा स्टाईलने विक्रोळातील एका व्यावसायिकाच्या घरी आयटीची धाड पडली. इन्कम टॅक्स अधिकाऱ्यांच्या वेशात पाच जणांच्या टोळीने ही धाड टाकून रोकड जप्तीची कारवाई केली, पण ही कारवाई म्हणजे लुटमार झाल्याचे स्पष्ट होताच हे प्रकरण पार्कसाईट पोलिसांकडे गेले. पोलिसांनीदेखील गुह्याची उकल करीत चौघांच्या मुसक्या आवळल्या.

विक्रोळीतील एका टॉवरमध्ये सोना (नाव बदललेले) व त्यांचे व्यावसायिक पती राहतात. इन्कम टॅक्स विभागाचे अधिकारी असल्याचे सांगत पाच जणांचे पथक 26 जुलैला त्यांच्या घरावर धडकले. त्या पथकाने घराची झडती घेतली, पण त्यांच्या हाती केवळ एक लाखाची रोकड लागली. ते पैसे घेऊन पथक निघून गेले, पण काहीवेळाने बोगस आयटी अधिकाऱ्यांनी लुटमार केल्याचे सोना यांना समजताच त्यांनी पार्कसाईट पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ निरीक्षक विनायक मेर, निरीक्षक विक्रम बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली एपीआय विनित कदम, उपनिरीक्षक मिलिंद बनसोडे तसेच मयेकर, पाटील, ठाकूर, कोल्हे, लहाने, गायकवाड या पथकाने शिताफीने तपास करीत चालक धीरज कांबळे, मनोविकार तज्ञ प्रशांत भटनागर, ट्रान्सपोर्टचा व्यवसायिक वसीम कुरेशी आणि इजाज यांना पकडले, तर या गुह्याचा मास्टर माइंड नितीन कोठारी तसेच नीता कांबळे, मरियम अप्पा आणि शमीम खान यांचा शोध सुरू आहे.

कोठारी आणि इजाजचा धारावीत कॉस्मेटिकचा व्यवसाय आहे. कोठारी स्वतःची ऑण्टिकरप्शन विभागासाठी काम करत असल्याची ओळख सांगतो. कोणाकडे खूप पैसा असेल आणि ते लपवत असतील तर मला सांगा, तेथे कारवाई करू. मोबदल्यात शासनाकडून दोन टक्के रक्कम मिळवून देतो, असे त्याने धीरजला सांगितले. धीरजची मानलेली बहीण नीता ही सोना यांच्याकडे घरकामाला होती. त्यांच्याकडे भरपूर पैसा असल्याची माहिती नीता धीरजला देत होती.

सोना यांच्याकडे भरपूर पैसा असल्याचे समजल्यानंतर नितीन कोठारीने मनोविकार तज्ञ भटनागर तसेच वसीम, इजाज, धारावीत राहणाऱ्या मरियम आणि शमीम यांना सोबतीला घेऊन एक कट रचला. त्यानुसार कशी रेड टाकायची हे त्याने समजवले. कोठारीने इन्कम टॅक्सचे प्रत्येकाला ओळखपत्र बनवून दिले. वर्षभर व्यवस्थित प्लॅन केल्यानंतर सोना यांच्या घरावर धाड टाकली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *