महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । शाळांमध्ये (Schools) विविध योजना राबविल्या जातात. क्रीडा तासाचं (Sports Hour) महत्त्व अभ्यासा इतकंच महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता एक नवीन निर्णय खास क्रीडा तासासाठी घेण्यात आलेला आहे. राज्यातील शाळांमध्ये क्रीडा तास सुरू करण्यासाठी नवीन धोरण तयार करण्यात येणार आहे. पूर्वी खेळाचा एक तास सक्तीचा होता. आता शाळांमध्ये क्रीडा तास अनिवार्य करण्याचे धोरण शासन तयार करणार असल्याची माहिती क्रीडा मंत्री गिरीश महाजन (Girish Mahajan) यांनी दिली.
क्रीडा तास सक्तीचा करण्याबरोबरच आणखी काही याच संदर्भातले निर्णय घेण्यात आलेले आहेत. राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री गिरीश महाजन यांनी मंगळवारी विधान परिषदेत सांगितले की, ‘खेळांना प्रोत्साहन देणे ही महाराष्ट्र सरकारसाठी महत्त्वाची बांधिलकी आहे. २००३ साली क्रीडा केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आणि १९ वर्षांपासून सरकारला आपले उद्दिष्ट पूर्ण करता आले नाही, हे दुर्दैव आहे. विधिमंडळाचे अधिवेशन संपताच मी माझ्या खात्यासोबत बैठक घेऊन समस्या आणि त्या कशा सोडवायच्या याचा आढावा घेईन.”
संकुल प्रमुखांच्या पदांवर मोठ्या प्रमाणावर रिक्त जागा आहेत, या संदर्भात विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना महाजन यांनी सभागृहाला सांगितले की, धोरणाच्या माध्यमातून १०० पदे निर्माण करण्यात आली आहेत, त्यापैकी ३५ पदे भरण्यात आली आहेत. ही पदे भरणाऱ्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) या महिन्याच्या अखेरीस मुलाखती संपवल्या जातील, असे आश्वासन विभागाला दिल्याचे त्यांनी सांगितले.