भाजपा-मनसे युती होणार ? प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले ….

Spread the love

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २५ ऑगस्ट । राज्यात हिंदुत्ववादी विचारांचे सरकार आल्याने त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय मनसेने घेतला. विधानसभेत मनसेच्या एकमेव आमदारानं सरकारच्या बाजूने मतदान केले. आता आगामी निवडणुकांमध्ये मनसे-भाजपा एकत्र येणार का? अशी चर्चा सुरू झाली आहे. त्यात जी परिस्थिती समोर येईल तसा निर्णय घेऊ असं विधान भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखऱ बावनकुळे यांनी युतीवर अधिक भाष्य करणं टाळलं.

चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, राज ठाकरे यांनी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची जी भूमिका घेतली आहे. त्याबाबत जनता निर्णय घेईल. जनतेला काय स्वीकारार्ह आहे ते मतपेटीतून समोर येईल. पक्ष वाढवण्यासाठी, पक्षाला बळ देण्यासाठी राज ठाकरेंनी हिंदुत्वाची भूमिका घेतली आहे. उद्धव ठाकरे हे हिंदुत्वापासून खूप दूर गेलेत. ४० आमदारांना सोडायला तयार आहेत परंतु सत्ता आणि शरद पवारांना उद्धव ठाकरे सोडत नाही. स्वातंत्र्यवीर सावरकर आणि नवाब मलिकांच्या भूमिकेवरून उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या दूर गेलेत हे सिद्ध झाले असा टोला त्यांनी लगावला.

तसेच भाजपा-शिवसेनेच्या युतीत एकनाथ शिंदे हे शिवसेनेचे पार्टनर आहेत. राज ठाकरेंनी महाराष्ट्रात घौडदोड केली तर पुढे बघू. राज ठाकरेंसोबत आमचे खूप चांगले संबंध आहेत. व्यक्तिगत संबंधात राजकारण येत नाही. राज ठाकरेंना मी भेटायला जाणार आहे. प्रत्येक पक्षाची वेगळी भूमिका असते. राज ठाकरेंच्या भूमिकेवर राज्यातील जनतेला काय वाटतं हे आम्ही सांगू शकत नाही. मनसेला सोबत घेण्याबाबत आज भाष्य करू शकत नाही. जसजशी परिस्थिती समोर येईल त्यावर निर्णय होऊ शकतो असं प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *