महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २६ ऑगस्ट । राज्यात अंशतः ढगाळ हवामान असून, पावसाची उघडीप असल्याचे चित्र आहे. कोकणासह मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर हलक्या ते मध्यम सरी पडत आहेत. आज (ता. 26) विदर्भात विजांसह पावसाची शक्यता आहे. तर उर्वरित राज्यात पावसाच्या उघडीपीसह हलक्या सरींची शक्यता आहे. कमाल तापमान आणि उकाड्यातही वाढ कायम राहण्याचा अंदाज आहे.
राज्यात मागच्या दोन महिन्यांपासून जोरदार पावसाने हजेरी लावली. दरम्यान मान्सूनने मागच्या दोन दिवसांपासून उघडीप दिल्याने पावसाचे प्रमाण थोडे थांबले आहे. परंतु हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून यंदा लवकरच माघारी परतणार असल्याचे सांगण्यात येत आहे. मान्सून सर्वसाधारण तारखेपेक्षा सुमारे पंधरा दिवस अगोदरच म्हणजे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यात माघारीच्या टप्प्यात दाखल होण्याची शक्यता असल्याची हवामान विभागाने माहिती दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार मान्सून संपण्याची परतण्याची सामान्य तारीख 17 सप्टेंबर आहे. पण, मान्सूनच्या वास्तविक माघारीचा प्रवास सामान्यतः एकतर आधी किंवा नंतर हवामान प्रणालीच्या गतिमान स्वरूपामुळे होतो. १ सप्टेंबरपासून सुरू होणाऱ्या पहिल्या आठवड्यात वायव्य भारतातील काही भागांतून मान्सून माघारी फिरण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, असे भारतीय हवामान विभागाने (IMD) जाहीर केलेल्या अंदाजात म्हटले आहे.
Subdued rainfall activity expected over the region during the week. Possibility of rain/thundershowers over parts of interior Maharshtra.
येत्या 5 दिवसांत आपेक्षित तीव्र हवामानाचा इशारा I तपशीलवार जिल्हानिहाय हवामान अंदाज व चेतावणीसाठी कृपया https://t.co/89p4H3QwEY भेट द्यI pic.twitter.com/chFnXVyms3
— Regional Meteorological Center,Mumbai (@RMC_Mumbai) August 26, 2022
संपूर्ण देशात मान्सूनचा पाऊस सामान्यपेक्षा नऊ टक्के जास्त पडला आहे. पण उत्तर प्रदेश, बिहार आणि मणिपूर सारख्या राज्यांमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीच्या सुमारे 40 टक्के पाऊस कमी झाला आहे. यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. उत्तर प्रदेश आणि मणिपूरमध्ये दीर्घ कालावधीच्या सरासरीपेक्षा प्रत्येकी 44 टक्के पाऊस कमी पडला आहे. त्यानंतर बिहारमध्ये हे प्रमाण 41 टक्के, दिल्ली 28 टक्के, त्रिपुरा आणि झारखंडमध्ये प्रत्येकी 26 टक्के आहे.
देशात 18 ऑगस्टपर्यंत शेतकऱ्यांनी 343.7 लाख हेक्टरवर भात पीक पेरणी केली होती. यंदा भात पेरणीचे क्षेत्र गेल्यावर्षीच्या तुलनेत 30.92 लाख हेक्टरने कमी झाले आहे. उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, मध्य प्रदेश, तेलंगणा आणि छत्तीसगडमध्ये भात पीक पेरणीचे क्षेत्र कमी झाले आहे.