महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलेल्या गणेश उत्सवासाठी खरेदीची लगबग सुरू झाली आहे. पण यंदा वाढलेल्या किंमतीमळे महागाईच्या झळा गणेश भक्तांना सोसाव्या लागत आहेत. गणेश मूर्तीपासून ते सर्व पूजा साहित्य आणि प्रसाद देखील (Worship Materials) यंदा महागात मिळणार आहे. जवळपास 25 टक्क्यांनी महागाई वाढली असून गणेशोत्सवात ‘महागाईचे विघ्न भक्तांच्या समोर उभे ठाकले आहे.
यावर्षी गणेश उत्सवावर कोरोनाचे सावट नसले तरी नागरिकांना महागाईच्या झळा सोसाव्या लागत आहेत. गेल्या वर्षी कोरोनाचे सावट असल्यामुळे गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरी झाला नव्हता. मात्र, यावर्षी मोठ्या उत्साहात गणरायांचे आगमन होणार आहे. अवघ्या काही दिवसावर गणेशोत्सव असल्याने तयारीसाठी नागरिकांची बाजारात गर्दी वाढली आहे. परंतु, यंदा गणपती बाप्पाच्या मूर्ती पासून ते प्रसाद, सजावट व पूजेच्या साहित्यांच्या किमतीत वाढ झाली आहे.
यावर्षी गणपती बाप्पाच्या मूर्तीमध्ये 20 ते 25 टक्क्यांची वाढ झाली आहे. यातच बाप्पांना चढवल्या जाणाऱ्या प्रसादांमध्ये प्रति किलो 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे तर सजावटीच्या साहित्यात 10 ते 20 टक्क्यांची वाढ झाली आहे. गेल्या वर्षी अडीच फुटांची गणपती मूर्ती अडीच ते तीन हजारापर्यंत विक्री व्हायची आता त्याच मूर्तीची किंमत साडेतीन ते चार हजार पर्यंत गेली आहे. 200 ते 250 रुपयापर्यंत विक्री होणारे घरगुती गणेशमूर्ती यंदा तीनशे ते पाचशे रुपयापर्यंत मिळत आहे.