‘खोके हराम’ नावाची संघटना ; सामनातून शिंदे गटाचं केलं नामकरण

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । ‘जगाच्या पाठीवर ‘बोको हराम’ नावाची एक बदनाम संघटना आहे. त्याच धर्तीवर महाराष्ट्रात ‘खोके हराम’ नावाची संघटना उदयास आली आहे. त्यात बोकेही आहेत आणि खोकेही आहेत. हरामखोरी हाच त्यांचा धर्म आहे, ‘खोके हरामां’चे अस्तित्व फार काळ राहणार नाही, असं म्हणत शिवसेनेनं (shivsena) पुन्हा एकदा शिंदे गटावर (shinde group) जोरदार टीका केली.

शिंदे सरकारचे पहिली पावसाळी अधिवेशन नुकतेच पार पडले. पण या अधिवेशनामध्ये शिवसेना आणि शिंदे गटांच्या आमदारांमध्ये तुफान राडा झाला. याच वादावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या दैनिक सामनाच्या (saamana) अग्रलेखातून टीकास्त्र सोडण्यात आले आहे.

‘महाराष्ट्रात गुरुवारी विधानसभा अधिवेशनाचे सूप वाजले. हे पावसाळी अधिवेशन होते. राज्यात यंदा पाऊसही तुफान झाला आहे, पण विरोधकांनी मागणी करूनही सरकार ओला दुष्काळ जाहीर करायला तयार नाही. कारण येथे सर्व सत्ताभोगी असून जनहिताच्या बाबतीत त्यांच्या अकलेचाच दुष्काळ पडला आहे. हा अकलेचा दुष्काळ शेवटचे दोन दिवस सभागृहातून विधानसभेच्या पायऱ्यांवर आला. पण खोकेछाप शिंदे गटाचा खरा चेहरा उघड झाला. पूर्वी तालेवार लोकांना रावसाहेब, रावबहादूर वगैरे उपाध्या लावल्या जात. पण शिंदे गटाच्या लोकांपुढे म्हणजे त्यांनी चोरलेले जे आमदार वगैरे मंडळी आहेत, त्यांच्या आडनावापुढे यापुढे वंशपरंपरेने ‘खोकेवाले’ ही उपाधी लागेल. अगदी सहज सोप्या भाषेत हा विषय समजवायचा तर ‘दिवार’ चित्रपटात अमिताभ बच्चन याच्या हातावर कोरले होते, ‘मेरा बाप चोर है!’ त्याच पद्धतीने या चोरांच्या पुढच्या पिढीच्या कपाळावर कोरले जाईल, ‘मेरा बाप, भाई, आजोबा खोकेवाला था! आणि त्याने महाराष्ट्राशी, बाळासाहेब ठाकरे यांच्याशी गद्दारी केली!’ हा शिक्का पुसता येणे कठीण आहे, अशी जळजळीत टीका सेनेनं शिंदे गटावर केली.

‘ दोन दिवसांपासून शिंदे गटाचे आमदार सभागृह सोडून विधानसभेच्या पायऱ्यांवर बसले व आम्ही ‘खोकेवाले नाही. आम्हाला खोकेवाले म्हणू नका’ असे सांगण्याचा केविलवाणा प्रयत्न करीत राहिले. अमरावतीमधील दोन आमदारांत तर खोके प्रकरणावरून चांगलीच जुंपली. रवी राणा विरुद्ध बच्चू कडू यांच्यातील कलगीतुऱ्यांने चोर कोण व खोकेवाले कोण याचा पर्दाफाश झाला. रवी राणा महाशयांनी बच्चू कडू यांच्यावर त्यांच्याच गावात जाऊन प्रहार केला. ते म्हणाले, ‘जिथे पैसा तिथे बच्चू कडू. बच्चूसाठी बाप बडा न भय्या, सबसे बडा रुपय्या!’ रवी राणा म्हणतात, ‘मी गुवाहाटीला जाऊन सौदेबाजी करणारा आमदार नाही.’ रवी राणा हे सत्ताधारी पक्षाचे व देवेंद्र फडणवीस यांच्या आतल्या गोटातील आमदार आहेत. ते रोज उठून हनुमान चालिसाचे पठण करतात. त्यामुळे त्यांना सत्य बोलण्याची प्रेरणा व बळ मिळत असावे. शिवाय रवी राणा यांनी जे हनुमान चालिसा आंदोलन सुरू केले त्यामुळे महाराष्ट्रातील खोकेवाल्या कौरवांच्या बाबतीत त्यांच्या मनात राग निर्माण झाला असावा. राणा यांनी मनी सत्याची चाड धरून बच्चू कडू खोकेवाला यांच्यावर जो हल्ला केला, त्यामागे त्यांच्या वरिष्ठांचीच प्रेरणा असावी’ असा टोला सेनेनं बच्चू कडूंना लगावला.

‘पावसाने राज्यात हाहाकार माजला आहे. दहीहंडीच्या खोकेवाले पुरस्कृत खेळाने अनेक गोविंदांचा मृत्यू झाला आहे, पण सत्ताधारी पक्षाचे ‘खोकेवाले गोविंदा’ विधानसभेच्या पायरीवर बसून हाणामारी करीत राहिले. महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेचे व स्वाभिमानाचे हे असे मातेरे झाले. महाराष्ट्रात व बाहेर जेथे जावे तेथे लोक खोकेवाल्यांच्या नावाने बोंब मारीत आहेत. दिल्लीत मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांनी जाहीरपणे सांगितले आहे की, ‘महाराष्ट्रातील खोक्यांचा फॉर्म्युला वापरून ‘आप’चे आमदार विकत घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे.’ म्हणजे महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या पायऱयांवर बसलेल्या खोकेवाल्यांचा उद्धार झालाच. बिहारात राजद-जदयुचे नेते जाहीरपणे बोलत आहेत, ‘महाराष्ट्र में जो खोकेवाली राजनीती हुई, वो बिहार में फेल हो गयी!’ पायरीवरच्या खोकेवाल्यांनी हे नीट समजून घ्यावे. सर्वत्र खोकेवाल्यांचीच धामधूम आहे. गद्दारीचे दुसरे नाव खोकेवाले पडले आहे. महाराष्ट्राला हा कलंकच लागला म्हणायचा’ अशी टीकाही सेनेनं केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *