महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । पुण्यामध्ये स्थानिकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा ताफा वाहतूककोंडीमध्ये अडकल्याची घटना शुक्रवारी रात्री घडली. पुण्यातील चांदणी चौक परिसरामध्ये उड्डाणपुलाच्या कामामुळे मोठी वाहतूककोंडी होत असल्याची तक्रार यावेळी पुणेकरांनी मुख्यमंत्र्यांकडे केली. विशेष म्हणजे ताफा अडकल्याने आणि त्याचवेळी स्थानिकांनी शिंदेंकडे तक्रार केल्यानंतर तातडीने त्यांनी या तक्रारीची दखल घेतली. दोनच दिवसांपूर्वी पुण्यातील विद्यापीठ चौक आणि चांदणी चौकातील रेंगाळलेले उड्डाणपुलांचे काम, त्यामुळे होणारी वाहतूककोंडी आणि पुणेकरांना होणारा त्रास याबाबत गुरुवारी थेट विधिमंडळातच प्रश्न उपस्थित करण्यात आला होता. त्यानंतर आता थेट या विषयावरुन मुख्यमंत्र्यांचा ताफा अडवण्यात आला आहे.
मुख्यमंत्री शिंदेंचा ताफा अडवून त्यांच्याकडे वाहतूककोंडीची तक्रार स्थानिकांनी केल्यानंतर त्यांनी लगेच अधिकाऱ्यांना फोन केला. शनिवारी सकाळी साडेआठ वाजता पुण्याच्या आयुक्तांना स्पॉटवर भेट द्या असे आदेश मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना दिले आहेत. काही न्यूज पोर्ट्लने दिलेल्या माहितीनुसार एक ट्रक बंद पडल्याने मुख्यमंत्र्यांचा ताफा वाहतूककोंडीत अडकला. त्यानंतर स्थानिक पोलिसांनी ताफ्याला वाहतूककोंडीमधून जागा करुन दिली. जेव्हा मुख्यमंत्री वाहतूककोंडीत अडकले त्याचवेळी स्थानिकांनी त्यांच्याकडे गाऱ्हाणं मांडलं. इंडिया टीव्ही न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार मुख्यमंत्री शिंदे हे वाहतूककोंडीत अडकल्याने गाडीमधून उतरुन रस्त्याच्या बाजूला येऊन उभे राहिले. त्यानंतर येथील काही स्थानिकांनी त्यांच्याकडे अशी वाहतूककोंडी रोजचा प्रकार झाला आहे अशी तक्रार केली.