महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २७ ऑगस्ट । स्व. आनंद दिघे यांना टाडा लागला. अडीच वर्षे त्यांनी तुरुंगात काढली, परंतु ते कोणाच्या पायाशी गेले नाहीत. गद्दारांना क्षमा नाही या विधानातून त्यांनी माघार घेतली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत ते शिवसेनेसाठीच झटत होते. त्यामुळे दिघेसाहेबांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, असा टोला शिवसेनेचे खासदार राजन विचारे यांनी शिंदे गटाला लगावला. आम्ही ओरिजनल आहोत आणि आमचीच शिवसेना खरी आहे, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
ठाण्याचे दिवंगत शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे यांच्या 21 व्या स्मृतिदिनानिमित्त विचारे यांनी शक्तिस्थळावर जाऊन त्यांना वंदन केले. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना ते म्हणाले, राज्यात जे काही सुरू आहे ते महाराष्ट्रातील जनतेला पटलेले नाही. हे सगळं जनता उघडय़ा डोळय़ांनी बघत आहे. त्यामुळे त्याचा हिसाब किताब जनताच करेल.