तीन डॉक्टर अन् एका नर्सला संसर्ग, सोलापुरातील करोनाग्रस्तांची संख्या ६१

Spread the love

Loading

महाराष्ट्र 24- ऑनलाईन । विशेष प्रतिनिधी। सोलापूर – सोलापुरात रविवारी करोनाबाधित अकरा नवे रूग्ण आढळून आले असून त्यापैकी एकाचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण रूग्णांची संख्या ६१ वर पोहोचली आहेत. यात पाच मृतांचा समावेश आहे. धक्कादायक म्हणजे आतापर्यंत शहरामध्ये असलेला करोनाचा फैलाव आता जिल्ह्याच्या ग्रामीण भागातही पसरला असून सांगोला पाठोपाठ मोहोळ तालुक्यात करोनाबाधित रूग्ण आढळून आला आहे. रविवारी नव्याने आढळून आलेल्या करोनाबाधित अकरा रूग्णांमध्ये तीन डॉक्टर आणि एका परिचारिकेचा समावेश आहे.

रविवारी रात्री उशिरा जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी करोना रूग्ण व मृतांची अधिकृत माहिती दिली. शहरात करोनाचा पहिला रूग्ण १२ एप्रिल रोजी आढळून आला होता. आतापर्यंत १४ दिवसांत रूग्णांची संख्या वाढून ६१ वर पोहोचली आहे. तर मृतांची संख्याही पाच झाली आहे. सध्या ५६ रूग्णांवर छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रूग्णालयात उपचार केले जात आहेत. अद्यापि करोना चाचणीचे १७६ अहवाल प्राप्त व्हायचे आहेत.

रविवारी आढळून आलेल्या करोना रूग्णांमध्ये शास्त्रीनगरातील तीन रूग्णांचा समावेश आहे. तर पाच्छा पेठ, हुतात्मा कुर्बान हुसेननगर, नई जिंदगी चौक, कर्णिकनगर, यशवंत सोसायटी, सोलापूर तालुका पोलीस ठाणेलगतचा परिसर आणि सोरेगाव एसआरपी कॅम्प परिसरात प्रत्येकी एक याप्रमाणे दहा रूग्ण नव्याने सापडले आहेत. तर एक रूग्ण मोहोळ तालुक्यातील पाटकूल गावात राहणारा आहे. जिल्ह्यात सांगोला तालुक्यातील घेरडी येथे काल शनिवारी करोनाबाधित रूग्ण आढळून आला होता. तूयापाठोपाठ मोहोळ भागातही करोनाचे लोण पसरल्यामुळे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात धोका वाढला आहे.

सोलापूर शहरात आतापर्यंत पाच्छा पेठ, भारतरत्न इंदिरानगर, हुतात्मा कुर्बान हुसेननगर, शास्त्रीनगर, मोदीखाना आदी भागात दाट लोकवस्त्यांच्या झोपडपट्टी भागात करोनाचे बहुतांशी रूग्ण आढळून आले आहेत. यात कर्णिकनगर, नई जिंदगी, यशवंत सोसायटी व सोरेगाव या भागातही करोनाचा फैलाव झाल्यामुळे तेथील नागरिकांपुढील संकट वाढले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *