दसरा मेळावा ; विचारांचे “सोने’ कोण लुटणार ? शिंदे गट आणि शिवसेनेत रस्सीखेच

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । गेल्या 55 वर्षांपासून होणाऱ्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावरून यंदा शिंदे गट आणि शिवसेनेत रस्सीखेच असल्याचे चित्र आहे. शिवाजी पार्कवर 5 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या दसरा मेळाव्यास अर्ज करूनही शिवसेनेला अद्याप मुंबई पालिकेकडून परवानगी देण्यात आली नाही. त्यामुळे यंदा शिवाजी पार्कवरून विचारांचे “सोने’ लुटण्याची संधी शिंदे गटाला मिळणार की शिवसेनेला, याची उत्सुकता लागली आहे.

एकनाथ शिंदे यांनी 40 आमदारांना साेबत घेऊन बंड केल्यानंतर भाजपसोबत सत्ता स्थापन केली. त्यानंतर शिंदे गटाने शिवसेना पक्ष आणि चिन्हावर दावा सांगितला आहे. राज्यात सत्ता स्थापन केल्यानंतर सेनेचे १२ खासदारही शिंदे गटात सहभागी झाले. शिंदे गटाने मुंबईमध्ये प्रति सेना भवन स्थापणार असल्याची घोषणा केली. नुकत्याच पार पडलेल्या अधिवेशनात शिवसेनेने शिंदे गटावर 50 खोक्यांवरून जोरदार टीका केली. त्यांनतर शिंदे गटाने थेट उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंवरही हल्ला चढवला. शिवसेना आणि शिंदे गटात सातत्याने संघर्ष सुरूच असून ही लढाई सर्वोच्च न्यायालयात गेली आहे. 30 ऑक्टोबर 1966 रोजी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवाजी पार्कवर पहिला दसरा मेळावा घेतला होता. त्यानंतर दसरा मेळावा आणि शिवसेना हे एक समीकरण बनले.

मेळाव्याला अजून वेळ – शिंदे
मुंबई महापालिकेवर गेल्या 25 हून अधिक वर्षे शिवसेनेची सत्ता आहे. मात्र, शिंदे यांच्या बंडानंतर चारही बाजूंनी ठाकरे यांना घेरण्यात येत आहे. आदित्य ठाकरे यांच्या वरळी मतदारसंघात नुकतीच भाजपने दहीहंडी घेतली. शिंदे गटाकडून शिवसेना पक्ष, धनुष्यबाण आणि आता दसरा मेळावाही हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू आहे. सध्या मुंबई महापालिकेवर प्रशासक आहे. त्यामुळे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासक इक्बालसिंग चहल यांच्याशी चर्चा करून दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान देण्याची विनंती केली आहे. मात्र, चहल यांनी परवानगीबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतला नाही. दरम्यान, दसरा मेळाव्याला अजून वेळ असून याबाबत लवकरच आपल्याला माहिती कळेल, असे सूचक वक्तव्य मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुण्यात शनिवारी रात्री केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *