महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । मागच्या दोन महिन्यापूर्वी शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांमुळे शिवसेनेला मोठी खिंडार पडली. दरम्यान यामध्ये शिवसेनेच्या प्रमुख पदावर असलेल्या नेत्यांनी बंडखोरी केल्याने त्यांची पदे रिक्त होती या पदांची नियुक्ती आज करण्यात आली. (Shiv sena bhaskar jadhav) शिवसेनेत पडलेल्या मोठ्या खिंडाराला भरण्याचे काम उद्धव ठाकरे यांनी हाती घेतल्याचे दिसून येत आहे. शिवसेनेचे निष्ठावंत आमदार आणि खासदारांची नेते पदी नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये भास्कर जाधव आणि अरविंद सावंत यांचा समावेश आहे.
राज्यभरात नव्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती केली जात आहे. उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच तीन महत्त्वाच्या पदांवरील नियुक्त्या जाहीर केल्या. यामध्ये उद्धव ठाकरे यांच्यासोबत शेवटपर्यंत राहणारे अरविंद सावंत आणि भास्कर जाधव यांना प्रमोशन मिळाले आहे. तर शिवसेनेचे बुजुर्ग नेते लीलाधर डाके यांचा मुलगा पराग डाके याच्यावर ही मोठी जबाबदारी दिली आहे. यामुळे शिवसेनेला उर्जीतावस्था येण्याची शक्यता आहे.
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने खासदार अरविंद सावंत, आमदार भास्कर जाधव यांची शिवसेना नेतेपदी आणि पराग लीलाधर डाके यांची शिवसेना सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शिवसेना मध्यवर्ती कार्यालयातून प्रसिद्धीस निघालेल्या पत्रकाद्वारे ही माहिती देण्यात आली आहे. पराग लीलाधर डाके यांची शिवसेनेच्या सचिवपदी वर्णी लागल्याची चर्चा आहे. तर विधानसभेत आक्रमकपणे शिवसेनेची बाजू लावून धरणाऱ्या भास्कर जाधव आणि संसदेत शिवसेनेचा किल्ला लढवणाऱ्या अरविंद सावंत यांना नेतेपद देऊन दोघांचेही प्रमोशन करण्यात आले आहे.