महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २८ ऑगस्ट । राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू व कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांच्या मागेही ईडीचा ससेमिरा लागण्याची शक्यता आहे. रोहित पवार संचालक राहिलेल्या ग्रीन एकर या कंपनीच्या प्राथमिक चौकशीला ईडीकडून सुरूवात झाल्याचे वृत्त प्रसारमाध्यमांनी दिले आहे. त्यावर आता रोहित पवार यांनी प्रतिक्रिया दिला आहे.
रोहित पवार म्हणाले, माझ्याविरोधात कुठल्या हेतून कारवाई केली जात आहे? सरकार मुद्दाम कारवाई करत आहे का?, हे मला माहिती नाही. मात्र, एक सामाजिक कार्यकर्ता, युवा म्हणून चौकशीला सामोरे जाईल व तपास यंत्रणांना पूर्ण सहकार्य करेल. तसेच, सरकार नेमक्या कुठल्या बुद्धीने ही कारवाई करत असेल, हे सांगता येत नाही, असा टोलाही रोहित पवारांनी लगावला.
रोहित पवार म्हणाले, मी संचालक राहिलेल्या ग्रीन एकर कंपनीचीच्या काही व्यवहारांची चौकशी होणार असल्याचे मीही ऐकत आहे. मात्र, नेमकी कशाची चौकशी आहे, काय कागदपत्रे कंपनीकडे आले आहेत, याबाबत माहिती नाही. हे तपासूनच याबाबत सविस्तर माहिती देईल. तसेच, यापूर्वीही अनेकदा चौकशी झाली आहे. त्यावेळीही तपास यंत्रणांना सहकार्य केल आहे. आताही करेल.