पीपीई कीट, मास्क राज्यात पुरेशा प्रमाणात उपलब्ध.; महाराष्ट्रातील कोरोना टेस्ट लॅबची संख्या ६० करण्याचा प्रयत्न.

Spread the love

Loading

महाराष्ट्र २४ ऑनलाईन – । बीड । विशेष प्रतिनिधी। आकाश शेळके।राज्यातील सरकारी रुग्णालये तसेच महानगरपालिकांच्या रुग्णालयात कोविड-१९ च्या रुग्णांवर होत असलेल्या चाचण्या, उपचार, जेवण या सर्व सुविधा मोफत देण्याचा निर्णय महाविकास आघाडी सरकारने घेतला आहे, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित विलासराव देशमुख यांनी सांगितले. झूम ऍपच्या माध्यमातून घेतलेल्या पत्रकार परिषदेत देशमुख बोलत होते,

ते पुढे म्हणाले की, कोविड-१९ च्या संकटाची चाहूल लागताच राज्य सरकारने तातडीने पावले उचलली असून वैद्यकीय शिक्षण विभागाअंतर्गत असलेली सर्व महाविद्यालये व रुग्णालये यांचे महाराष्ट्रभर जे जाळे आहे त्यामाध्यमातून तत्परतेने काम सुरु केले. राज्यात फक्त चार टेस्ट लॅब होत्या त्यांची संख्या वाढवून आज सरकारी तसेच खाजगी अशा ४० लॅब कार्यान्वित आहेत आणि त्यात वाढ करुन ६० पर्यंत केल्या जातील. या ४० लॅबमधून दररोज ७ हजार चाचण्या केल्या जास्त आहेत यातूनच आजपर्यंत महाराष्ट्राने सर्वात जास्त एक लाखांपेक्षा जास्त चाचण्या केल्या आहेत. चाचण्याची संख्या वाढत आहे परंतु आणखी जास्त प्रमाणात टेस्ट कीटची गरज आहे ती केंद्र सरकारने दिली पाहिजेत. मुंबई, नागपूर, पुणे, नाशिक, अमरावती, यवतमाळ, सोलापूरसह अनेक जिल्ह्यातील सरकारी रुग्णालये आवश्यक त्या सर्व यंत्रसामुग्रीसह सक्षम करुन कोविड-१९ चा लढा देण्यासाठी सज्ज केलेली होती.


कोविड-१९ चा लढा देण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पीपीई कीट व मास्कची संख्या पुरेशा प्रमाणात उपलब्ध असून आवश्यक असणारी अधिक मास्क व कीटची मागणी केंद्र सरकारकडे केलेली आहे. राज्य सरकार पारदर्शकपणे काम करत असून रुग्ण संख्या दडवत असल्याच्या विरोधकांच्या आरोपात काहीही तथ्य नाही. कोविड-१९ वर अजूनतरी कोणतीही लस किंवा औषध उपलब्ध नाही, लोकांनी सावध व सतर्क रहावे, कसलेही सामाजिक दडपण न घेता कोरोनाची लक्षणे दिसताच ताबडतोब डॉक्टरांकडे संपर्क साधावा असे आवाहनही देशमुख यांनी केले आहे.
कोरोनाच्या संकटामुळे खाजगी हॉस्पिटल्स बंद असून डायलीसीससारख्या रुग्णांची परवड होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. अशा प्रकारच्या तक्रारी मुंबई, पुणे शहरातून जास्त प्रमाणात येत आहेत इतर भागातून नाहीत परंतु मुख्यमंत्र्यासह आम्ही सर्वांनी खाजगी हॉस्पिटल्सना मानवतेच्यादृष्टीने सेवा चालू ठेवण्याचे आवाहन केलेले आहे अशा स्थितीतही खाजगी हॉस्पिटल्स सुरु नाही केली तर सरकारला त्यांच्यावर कारवाई करण्याशिवाय दुसरा पर्याय नाही. मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच महसूलमंत्री हे २४ तास कार्यरत असून सर्व मंत्रालयामध्ये समन्वय साधून युद्धपातळीवर कोविड-१९ च्या विरोधात लढा देत आहेत. पालकमंत्रीही या सर्व स्थितीवर लक्ष ठेवून आहेत. कोविडच्या विरोधात लढणाऱ्या वैद्यकीय अधिकारी-कर्मचारी, पोलीस, पाणी पुरवठा विभागाचे कर्मचारी, सफाई कर्मचाऱ्यांसह या लढाईत योगदान देणाऱ्या योध्यांचे देशमुख यांनी आभारही मानले..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *