महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ सप्टेंबर । सूर्यकुमार यादव नावाचे अजब तुफान बुधवारी हाँगकाँग संघाविरुद्ध फलंदाजीला उतरला आणि विजेचा मीटर धावावा तसा वेगाने हिंदुस्थानी धावफलक धावू लागला होता. कारण क्रिकेट बुकात अस्तित्वात नसलेले अगडम-तिगडम फटके मारून सूर्याने हाँगकाँगच्या क्रिकेटपटूंसह त्याच्या जगभरातील चाहत्यांना चक्क तोंडात बोटे घालायला लावली. त्याचे अक्राळविक्राळ फटके बघून नवख्या हाँगकाँगचे गोलंदाज पार सैरभैर झाले होते. सूर्याच्या खेळीतील हुक्स, कट्स, हेलिकॉप्टर शॉट आणि उसळी घेणाऱया वेगवान चेंडूंना त्याने केवळ दिशा देत मारलेले तुफानी फटके पाहून प्रतिस्पर्धी गोलंदाज पार चक्रावून गेले होते.
सूर्याच्या या झंझावाती खेळीने क्रिकेटरसिकांना महेंद्रसिंह धोनी आणि मिस्टर 360 डिग्री ए. बी. डिव्हिलियर्स या महान क्रिकेटपटूंची प्रकर्षाने आठवण झाली.
के. एल. राहुल 39 चेंडूंत 36 धावा करून बाद झाला. त्याचा स्ट्राइक रेट केवळ 92.30 होता. तो बाद झाल्यानंतर मैदानात सूर्यकुमार यादव उतरला. त्याने हाँगकाँगच्या गोलंदाजाची अक्षरशः पिसे काढून दुबईच्या खेळपट्टीवर कशी फलंदाजी करावी हे दाखवून दिले. सूर्यापुढे हाँगकाँगचे सर्वच गोलंदाज फिके पडले. त्याच्या स्पह्टक फलंदाजीमुळे दक्षिण आफ्रिकेचा माजी स्टार खेळाडू ए.बी. डिव्हिलियर्स व माजी हिंदुस्थानी कर्णधार महेंद्रसिंह धोनीची आठवण ताजी झाली. सूर्याने आपल्या डावात डिव्हिलियर्सचे 360 डिग्री फटके व धोनीच्या हेलिकॉप्टर शॉट्सचे दर्शन घडवले.
आयुष शुक्ला हिंदुस्थानी डावातील 18 वे षटक टाकण्यासाठी आला आणि त्याच्या चौथ्या चेंडूवर सूर्याने धोनीसारखा हेलिकॉप्टर शॉट लगावला. हा चेंडू सीमारेषेबाहेर गेला. या षटकामध्ये सूर्याने 15 धावा काढल्या.
शेवटच्या षटकात 4 षटकार
विराट कोहलीच्या साथीने सूर्यकुमार यादवने शेवटच्या 3 षटकात 54 धावा चोपून काढल्या. यामध्ये सूर्याने तडाखेबंद फलंदाजी करत 41 धावा काढल्या. डावाच्या शेवटच्या षटकात त्याने 4 षटकार ठोकले. 20 वे षटक टाकण्यासाठी आलेल्या हारून अर्शदच्या चेंडूवर त्याने एकूण 26 धावा काढल्या.
हिंदुस्थानी डावाचे 16 वे षटक सुरू होते. यावेळी हाँगकाँगचा गोलंदाज एजाज खानची गोलंदाजी होती आणि त्याचा ओव्हरमधील चौथा चेंडू होता. एजाजने सूर्याच्या ऑफ साइडच्या बाहेर चेंडू टाकला. सूर्यकुमारने एक पाऊल पुढे टाकत डिव्हिलियर्सच्या शैलीत झुकून चेंडू टोलवला आणि पाहता पाहता तो चेंडू यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून सीमारेषेबाहेर गेला. सूर्याचा हा फटका पाहून एजाजसह संपूर्ण हाँगकाँग टीम त्या चेंडूकडे आ वासून बघतच राहिली. यावेळी समालोचन करणाऱया माजी खेळाडूंनी तर सूर्याच्या नावाचा हिंदुस्थानचा डिव्हिलियर्स म्हणून खास उल्लेख केला.