महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि.२ सप्टेंबर । एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेत (Shivsena) उभी फूट पडली. शिंदे गटाच्या बंडाळीनंतर राज्यात नवीन सरकार स्थापन झालं. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली.
सत्तेत आल्यानंतर शिंदे गटाकडे येणाऱ्या नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची संख्या सतत वाढत होती. मात्र आता शिंदे गटाला कोल्हापुरात पहिला धक्का बसला आहे. कोल्हापूरचे माजी उपमहापौर दिगंबर फराकटे यांनी शिंदे गटाला सोडचिठ्ठी देत पुन्हा काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे.
अवघ्या 15 दिवसांमध्येच फराकटे हे शिंदे गटातून स्वगृही परतले आहेत. या प्रकरणामुळे राजकीय वातावरणात चर्चांना उधाण आले आहे. राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या उपस्थितीमध्ये 15 दिवसांपूर्वी दिगंबर फराकटे यांनी शिंदे गटात प्रवेश केला होता.
तसेच आपण सतेज पाटील, मालोजीराजे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार असल्याचे फराकटे यांनी स्पष्ट केलं आहे. फराकटे यांनी एक पत्रक काढत शिंदे गटातून बाहेर पडत असल्याचं सांगितलं आहे.
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर शिवसेनेचे ४० व अपक्ष १० असे ५० आमदार त्यांच्यासोबत ते. त्यानंतर उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपद सोडावं लागलं होते. त्यानंतर एकनाथ शिंदे यांनी भाजपला सोबत घेऊन सरकार स्थापन केले. एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपत घेतली.
शिवसेनेत बंडाळी झाल्यानंतर पक्षात उभी फूट पडली आहे. त्यामुळे शिवसेनेत एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे असे दोन गट तयार झाले. त्यावरून आता खरी शिवसेना कुणाची तसेच पक्षाच्या निवडणूक चिन्हावर कुणाचा हक्क याचा निर्णय न्यायालयात प्रलबिंत आहे.