महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि २ सप्टेंबर । अकोल्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. यात नुकतंच शिंदे गटात सहभागी झालेल्या अकोला उपशहर प्रमुख भागवत देशमुखची हत्या करण्यात आली आहे. 28 वर्षीय भागवत देशमुखची गळा दाबून हत्या करण्यात आल्याचं समोर आलं आहे. हत्येनंतर मृतदेह कापसी तलावात फेकून देण्यात आला होता. या हत्येचं नेमकं कारण अद्याप समोर आलेलं नसून पोलीस सध्या आरोपीचा शोध घेत आहेत.
27 ऑगस्टला पातूर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कापसी तलावात एका अनोळखी युवकाचा मृतदेह आढळून आला होता. मात्र, हा मृतदेह दोन दिवसांपासून पाण्यात असल्याने त्याची ओळख पटू शकली नाही. हा मृतदेह वैद्यकीय चाचणीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आला. वैद्यकीय तपासणीच्या अहवालात या युवकाची हत्या झाल्याचं समोर आलं. अखेर ओळख न पटल्याने पोलिसांनी मृतदेहावर अंत्यसंस्कार केले.