महाराष्ट्र २४ । विशेष प्रतिनिधी । दि. २ सप्टेंबर । एकनाथ शिंदे शिवसेनेतले महत्त्वाचे मंत्री आणि मोठ्या प्रमाणावर आमदार घेऊन सेनेतून वेगळे झाले आणि त्यानंतर त्यांनी भाजपासोबत हातमिळवणी करत सरकारही स्थापन केलं. या सगळ्यात त्यांनी आपणच खरी शिवसेना असल्याचा दावाही केला आहे. तसंच त्यांनी पक्षाच्या चिन्हावरही हक्क सांगितला आहे. हा वाद सर्वोच्च न्यायालयात असतानाच आता शिंदे गट दसरा मेळावाही घेणार आहे.
शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाने दसरा मेळाव्याची परंपरा कायम राखली आहे. यंदा शिवसेनेत अभूतपूर्व बंड झालं आणि पक्षाच्या अस्तित्वावरच प्रश्नचिन्ह उभं राहिलं आहे. आता खरी शिवसेना उद्धव ठाकरेंची की एकनाथ शिंदेंची हा प्रश्न उभा राहिला आहे. त्यामुळे यंदाचा दसरा मेळावा ऐतिहासिक ठरणार हे निश्चितच होतं. हा मेळावा एकनाथ शिंदे घेणार की उद्धव ठाकरे हाही प्रश्न आहेच .
एकनाथ शिंदे याना शिवाजी पार्कवरच हा दसरा मेळावा घेता यावा यासाठी वेगाने हालचाली सुरू आहेत. एकनाथ शिंदे यांच्याच अध्यक्षतेखाली हा मेळावा होणार असल्याचं आता जवळपास निश्चित होऊ लागलं आहे. मुख्यमंत्री शिंदेंनी याबद्दल सर्व आमदारांना सूचनाही दिल्या आहेत.
यंदाच्या मेळाव्यामध्ये भाजपाही सहभागी होण्याची चर्चा आहे. विशेष म्हणजे शिवसेनेतून नाराज होऊन बाहेर पडलेले आणि आता भाजपामध्ये असलेले केंद्रीय मंत्री नारायण राणेही या मेळाव्याला हजेरी लावणार असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे यंदाचा मेळावा खऱ्या अर्थाने ऐतिहासिक ठरणार .